नाशिक : काेरोना रुग्णसंख्येत सतत वाढ सुरूच असताना, शुक्रवारी (दि. १६) आत्तापर्यंत प्रथमच बळींची संख्या चाळिशी ओलांडून ४१ वर पोहोचली आहे तर जिल्ह्यात ४,४३५ रुग्ण बाधित झाले असून ४,५९६ रुग्ण बरे झाले आहेत.
एकाच दिवसात एकूण ४१ बळी गेले असून, त्यात सर्वाधिक २६ बळी नाशिक ग्रामीण क्षेत्रामधील आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २,८५७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच वाढणारे बळी रोखणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरले आहे. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २,४०३ तर नाशिक ग्रामीणला १,८३२ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १५० व जिल्हाबाह्य ५० रुग्ण बाधित आहेत. तसेच जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ९, ग्रामीणला २६, मालेगाव मनपा क्षेत्रात ४, जिल्हाबाह्य २ असा एकूण ४१ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा निष्प्रभ ठरली आहे. गत आठवड्यात मृतांची संख्या सातत्याने तीसहून अधिक राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यापेक्षाही कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, असाच सूर सामान्य नागरिकांकडून व्यक्त होऊ लागला आहे.
इन्फो
ग्रामीणमध्ये प्रथमच तिप्पट बळी
कोरोनाच्या पहिल्या लाटेसह दुसऱ्या लाटेच्या प्रारंभीच्या टप्प्यातदेखील जिल्ह्यात बळींमध्ये नाशिक शहराची आघाडी होती. मात्र, एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून काही दिवस नाशिक शहर तर काही दिवस नाशिक ग्रामीण बळींमध्ये पुढे जात असल्याचे दिसून येत होते. मात्र शुक्रवारी नाशिक शहराच्या तुलनेत सुमारे तिप्पट बळी नाशिक ग्रामीणला गेल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाची दहशत अधिक वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे.
इन्फो
प्रलंबित अहवाल ७ हजारांवर
गत महिन्यापासून दररोज वाढत असलेल्या नमुन्यांमुळे कोरोना काळात सातत्याने प्रलंबित अहवालांची संख्या वाढलेली होती. गत दोन दिवसांत प्रलंबित अहवालांनी १० हजारांचा आकडा ओलांडला होता. मात्र, त्यात गुरुवारी अधिक प्रमाणात प्रलंबित अहवाल प्राप्त झाल्याने ही संख्या ७,६४७ वर आली आहे. त्यात सर्वाधिक प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणचे ४१६२, नाशिक मनपा क्षेत्रातील २९०९ तर मालेगाव मनपाचे ५७६ अहवाल प्रलंबित आहेत. प्रलंबित अहवालांची संख्या अद्याप वाढलेलीच असल्याने पुढचे चार दिवस बाधितांच्या प्रमाणात वाढ राहण्याची शक्यता आहे.