मालेगाव : दिवसरात्र यंत्रमागचा खडखडाट... शहरात रात्री खवय्यांची उशिरापर्यंत असणारी गर्दी.. अन् त्यात रात्री उशिरापर्यंत महिलांसह आबालवृद्धांमुळे फुलणारे शहरातील रस्ते, सध्या कोरोनामुळे जागच्या जागी थांबले... रात्री उशिरापर्यंत फुलणारा किदवाई रोड आता भरदिवसाही असलेला शुकशुकाट आणि पोलीस बंदोबस्त यामुळे शापित गावासारखा झाला असून, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घेऊन पुन्हा कधी चहल पहल होईल याची वाट पहात आहे.सर्वच शहराची रौनक गेली असून, मालेगाव आता कोरोना संकटामुळे स्तब्ध आहे. परिणामी मालेगाव की ‘जिंदगी थम सी गयी है’ असे लोक बोलू लागले आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात सर्वांना घरात कोंडून टाकले असून, शहरातील गूळ बाजार, किदवाई रोड, मोहमद अली रोड, पवार गल्ली, अंजुमन चौकसह पश्चिम भागातील व्यावसायिक जे रात्रभर दुकान सुरू ठेवतात ती दुकाने ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. दहा दिवसांवर आलेली रमजान ईद यंदा लॉकडाऊनमुळे घरातच साजरी करावी लागणार असल्याने शिरखुरम्यासाठी लागणारे साहित्य खजूर, शेवया, सुत्तरफेनी, बदाम आदी साहित्य कसे घरी आणावे, असा प्रश्न आहे. अद्याप नवे कपडे, चपला, अत्तर, बांगड्या, टोप्या बंदमुळे खरेदी करता आलेल्या नाहीत. लहान मुलांचा आनंद तर हिरावला गेलाच; पण अनेकांच्या घरातील बुजुर्ग आणि कर्त्या लोकांना कोरोनाने हिरावून नेल्याने ईद कशी साजरी करावी हाच खरा यांच्या घरातील महिला आणि मुलांसमोर प्रश्न आहे. रमजानच्या महिन्यात चोवीस तास गर्दीने बहरलेलं शहर रोजच वाढणाऱ्या कोरोना रुगणांच्या संख्येमुळे हतबल झाले आहे. बंदमुळे बाहेरगावहून खरेदीसाठी येणारे ग्राहकही नाहीत.-------------------------------------यंत्रमाग बंद असल्याने कामगारांच्या खिशात चार पैसेही नाहीत. रोज खाण्याचेच वांदे झाल्याने रमजान ईद साजरी तरी कशी करणार? न कुठे विद्युत रोषणाई न मशिदीत रोज पार पडणारी तरावीहची नमाज पढली जात आहे. शहरातील सर्व इदगाह मैदानेदेखील केवळ पोलिसांनी भरले आहेत.
कोरोनासे जिंदगी थम सी गयी है...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 9:23 PM