शेखर देसाई ।लासलगाव : जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतर मंगळवारी (दि. १४) त्याला जिल्हा रुग्णालयातून सोडण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिकांसह कर्मचाऱ्यांनी त्याला टाळ्या वाजवत, उत्साहाने निरोप दिला. पहिला रुग्ण पूर्णपणे बरा होऊन कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्याचा आनंद साºयांच्याच चेहºयावर ओसंडून वाहत होता, तर सदर रुग्णही मृत्यूच्या दाढेतून बाहेर निघाल्याने भावनाविवश झाला होता. दरम्यान, या रुग्णाचे लासलगाव येथेही स्वागत करण्यात आले.जिल्ह्यात निफाड तालुक्यात दि. २५ मार्च रोजी पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. या ३५ वर्षीय तरुणाला तत्काळ जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करत उपचार सुरू करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयात १४ दिवसांच्या उपचारानंतर त्याच्या दोनदा वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या. त्यात त्याचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला मंगळवारी रुग्णालयातून सोडण्यात आले. याचवेळी या तरुणाच्या संपर्कात आलेल्या २१ जणांची शासनाच्या देखरेखीखाली सुरू असलेली क्वॉरण्टाइनची मुदत संपल्याने त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आला. मात्र कोरोनामुक्त तरु णाला पुढील १४ दिवसांसाठी होम क्वॉरण्टाइन करण्यात आले असून, त्याच्यावर निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले, लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे व पिंपळगावनजीक येथील ग्रामसेवक एस.एस. कदम यांचे विशेष पथक लक्ष ठेवणार आहे.मंगळवारी सदर कोरोनामुक्त रुग्णाला जिल्हा रुग्णालयातून सोडण्यात आले त्यावेळी त्याच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांच्या पथकासह परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांच्या चेहºयावर आनंद ओसंडून वाहत होता. सर्वांनी टाळ्या वाजवत त्याला निरोप दिला आणि त्याला दीर्घायुष्य चिंतिले. त्यानंतर या कोरोनामुक्त तरुणाचे पिंपळगाव नजीक येथेही स्वागत करण्यात आले. यावेळी निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे, निफाडचे गटविकास अधिकारी संदीप कराड , निफाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण, निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले, लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, निफाड उपसभापती शिवा सुरासे, पिंपळगाव नजीकच्या सरपंच सौ. सुनीता सचिन शिंदे, सचिन शिंदे, निवृत्ती जगताप, ग्रामविकास अधिकारी एस.एस. कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे, गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी कोरोनामुक्त तरुणाचे पिंपळगाव नजीक येथील उर्दू शाळेत प्रशासनाच्या वतीने शाल, हार, श्रीफळ व पुष्प देऊन स्वागत केले.डॉक्टर्स हे माझ्यासाठी परमेश्वरच!जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर आणि त्यांच्या टीमने दिलेल्या मानसिक आधारामुळेच या जीवघेण्या कोरोनावर मात करणे शक्य झाले. माझ्यासाठी ते परमेश्वरच असल्याची भावना या तरुणाने व्यक्त केली आहे.कोरोनाची लागण झाल्याचे कळताच माझे डोके बधिर झाले. मात्र, त्यावेळी डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. अनंत पवार, डॉ. गुंजाळ, कक्षातील नर्स यांनी मानसिक आधार दिला. डॉ. पवार तर माझ्याशी केव्हाही फोनवर बोलायचे आणि मानसिक बळ द्यायचे. सध्या दाखल असलेल्या प्रत्येक कोरोनाबधित व संशयितांसाठी ते दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. त्यांना सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. ताप आल्यानंतर आपल्याला कोरोना झाला आहे, याची साधी शंकाही आली नाही. पण जे व्हायचे होते, तेच झाले. कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. पण जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाºयांनी आधार दिला. त्यामुळे आपल्याला कोरोना झाला होता, हेच मी विसरून गेलो, अशी भावनाही या रुग्णाने व्यक्त केली.
कोरोनामुक्त तरुण परतला सुखरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:46 PM
जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतर मंगळवारी (दि. १४) त्याला जिल्हा रुग्णालयातून सोडण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिकांसह कर्मचाऱ्यांनी त्याला टाळ्या वाजवत, उत्साहाने निरोप दिला.
ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज : डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी जल्लोषात दिला निरोप