नाशिक : ठाणे- भिवंडी सह विविध भागातून उत्तर भारत आणि राजस्थानकडे जाणाऱ्या सुमारे पाचशे परप्रांतीयांना नाशिक शहराच्या सीमेजवळ अंबड येथे पोलिसांनी पकडले असून त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आले आहेत. तथापि, रोजगारासाठी विविध भागात आलेले मजूर आणि कष्टकरी आपापल्या भागात जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यातून होणारा संसर्ग टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्र सरकारनेही मजुरांना आहे त्या ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतरही विविध मार्गाने आपल्या गावी जाणाऱ्यांची पराकाष्ठा सुरू आहे. त्यासाठी वाटेल तेवढे पैसे मोजून ते बेकायदा वाहतुक साधनांचा वापर करीत आहेत.
आज सकाळी भिवंडी परिसरातील काही मजूर अशाप्रकारे कंटेनर आणि ट्रक मधून ट्रकमधून निघाले असताना नाशिक शहराच्या सीमेवर म्हणजेच अंबड येथील गरवारे पॉईंटवर त्यांना अडवण्यात आले. इमर्जन्सी सर्विस असे लिहिलेल्या कंटेनरमधून हे नागरिक उत्तर भारत आणि राजस्थानमध्ये जात असल्याचे आढळले. पोलिसांनी तीन ट्रक आणि कंटेनर जप्त केले असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे.