नाशिक : नाशिक पोलीस आयुक्तालयात कोरोनाने शिरकाव केला असून शहरी भागातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आता धोकादायक ठरू लागली आहे. मागील सहा दिवसांत अंबड पोलीस ठाण्यातील दुसऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला.
अंबड पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागात कार्यरत असणारे 51वर्षीय हवालदार यांना कर्तव्य बजावताना मृत्यूला कवटाळावे लागले. करोनाशी लढा देताना त्यांचा सोमवारी (दि.31) दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण आयुक्तालयात शोककळा पसरली आहे. गेल्या सोमवारी(दि.24) अंबड पोलीस ठाण्यातील एका 55वर्षीय ठाणे अंमलदाराचा कोरोनाने बळी घेतला. या आठवडाभरात नाशिक शहर पोलीस दलाने दोन कोरोना योध्यांना गमावले आहे. यापूर्वी इंदिरानगर पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
गोपनीय शाखेचे हवालदार हे लॉकडाऊन काळात कायम पोलीस ठाण्यात हजर राहून कर्तव्य बजावत होते. या काळात विविध उपक्रम राबविण्याबरोबरच काही दिवसांपूर्वी गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांच्या बैठकीचे आयोजन करून गणेशोत्सवबाबतच्या त्यांनी मंडळांना विविध सूचनाही केल्या होत्या. अत्यंत मनमिळावू आणि स्पष्टवक्ता म्हणून त्यांची पोलीस दलात ओळख होती. मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यानं त्रास होऊ लागल्याने त्यांनी तपासणी केली. दरम्यान, त्यांचा कोरोना नमुना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी व जावई असा परिवार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट
संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती