नाशिक- शहरातील एका महिलेचा 2 मे रोजी शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला होता. तिचा मृत्यूपूर्वी घेतलेला तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नाशिक शहरातील हा कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. महापालिकेच्या वतीने पुणे मार्गावर घर सर्वेक्षण करताना ही महिला आढळली होती. तिची प्रसूती धोकादायक असल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिकेच्या वतीने तिला आडगाव येथील रुग्णालयात तातडीने दाखल होण्यास गेल्या 24 एप्रिल रोजी सांगण्यात आले होते.मात्र ही महिला दाखल झाली नव्हती मात्र 2 मे रोजी ती जिल्हा शासकीय रुग्णलयात दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात तिचा मृत्यू झाला. मात्र त्यापूर्वी तिची कोरोना तपासणी करण्यात आली होती आज सकाळी हा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात पहिल्या कोरोना बळीची नोंद झाली आहे. मनपाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेंद्र त्र्यंबके यांनी ही माहिती दिली. सदरच्या महिलेला कोरोना संसर्ग कसा झाला याची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या जोखमीच्या व्यक्तींची माहिती संकलित केली जात आहे.
CoronaVirus : धक्कादायक! नाशिक शहरात कोरोनाचा पहिला बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 12:22 PM