नाशिक - शासनाने लावलेला कडक लाॅकडाऊन, महसूल, पोलीस प्रशासनाने त्याची केलेली अंमलबजावणी, आरोग्य विभागाने वाढवलेल्या टेस्टिंग, ट्रेसिंग, तत्काळ केलेले उपचार, वाढलेले संस्थात्मक विलगीरण केंद्र यामुळे तालुक्यात कोरोनाचा जोर ओसरला आहे. तालुक्यातील ३६ गावे गावांमधून कोरोना हद्दपार झाला असून ही बाब तात्पुरती तरी सुखावह आहे. ५ पेक्षा कमी रुग्ण संख्या असलेल्या असलेली गावेही आता ५० च्या घरात पोहोचली असून येत्या आठ दिवसात या गावांमध्येही नव्याने रुग्ण न आढळल्यास तेथेही समाधानकारक चित्र निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहु पाटील यांनी सांगितले. हे चित्र समाधानकारक असले तरी लॉक डाउन शिथिल झाल्यामुळे पुन्हा एकदा बाजारात नागरिकांची गर्दी वाढू लागली असून सार्वजनिक समारंभ, लग्न समारंभ सुरु झाल्याने आरोग्य विभागाची चिंता अजूनही कमी झालेली नाही. लाॅकडाऊमुळे अनेक नागरिकांनी घरात बसणे पसंत केले. तसेच दुसऱ्या लाटेत मृत्युदर कमालीचा वाढल्याने नागरिकांमध्ये कोरोना विषयी काहीशी भीती निर्माण झाली. त्यामुळे कोरोना चाचणीकडे नागरिकांचा कल वाढला, त्यातूनच तातडीने उपचार करण्यात आले. गावोगावी विलगीकरण कक्ष उभारल्याने तेथेही रुग्णांची सोय झाल्याने गावातील रुग्ण संख्या आटोक्यात येण्यास मदत झाली. त्यामुळे तालुक्यातील कोरोना संसर्गाची आकडे सध्यातरी मोठ्या प्रमाणात घटले असून ही बाब दिलासा देणारी आहे. उर्वरित गावांनीही कोरोना मुक्त झालेल्या गावांचा आदर्श घ्यावा आणि तालुका कोरोना मुक्त करावा, अशी अपेक्षा आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे.या गावांनी मिळवला कोरोनावर विजय वावी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वावी, कहांडळवाडी, मिरगाव, वारेगाव, दुशिंगपूर, निर्हाळे, मलढोण, मर्हळ, सुरेगाव, दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत धुळवड, कासारवाडी, देवपूर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत शहापूर, केदारपुर, खोपडी बुद्रुक, खोपडी खुर्द, दहिवाडी, महाजनपूर, भरतपूर, लक्ष्मणपूर, शहा, चोंढी, नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत जोगलटेंभी, पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत कोनांबे, धोंडबार, औंढेवाडी, चंद्रपूर, खापराळे, वडगाव पिंगळा, ठाणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत हिवरे, डुबेरेवाडी, पाडळी, आशापूर, रामनगर, गुरेवाडी, आटकवडे, आडवाडी या ३९ गावांतून सध्या कोरोना हद्दपार झाला आहे.'कोरोनामुक्त झाल्याच्या अविर्भावात नागरिकांनी राहू नये. गर्दीत जाणे टाळावे, लक्षणे दिसल्यास तत्काळ कोरोना तपासणी करून विलगीकरण केंद्रात, दवाखान्यात दाखल होऊन उपचार घ्यावेत. सावधानता बाळगावी, बेफिकीर राहू नये. -डाॅ. मोहन बच्छाव, तालुका आरोग्य अधिकारी, सिन्नर
Coronavirus: सिन्नरला ३६ गावांमधून कोरोना हद्दपार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 3:16 PM