नाशिक - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यामध्ये रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असणार आहे. तर ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबई, पुणे वगळता अनेक शहरांत जनजीवन सुरळीत होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. याच दरम्यान महाराष्ट्रातील एका शहरात लग्नसोहळ्यांना सशर्त परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नाशिकमध्ये परवानगी देण्यात आली असून नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नाशिक शहरात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी सर्व दुकानं सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे लग्नसोहळ्यांना प्रथमच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विवाह सोहळा करता येणार असून जास्तीत जास्त 50 लोकांचा समावेश असणार आहे. मात्र लग्नासाठी प्रवास करता येणार नाही. जिल्हाबंदीचे नियम लागू आहेत. ज्या भागात कोरोना रुग्ण नाहीत, त्या भागासाठी हे सर्व बदललेले नियम असल्याचे ही आदेशात म्हटले आहे.
नाशिक जिल्ह्यात ज्या भागात कोरोना रुग्ण सापडले आहेत, ते प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. त्या क्षेत्रात जुनेच नियम लागू असतील. तिथला लॉकडाऊन पूर्वीसारखाच फक्त अत्यावश्यक सेवांपुरता मोकळा होईल. अन्य दुकानं बंदच राहणार आहेत. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दारूच्या दुकानाबाबत मात्र स्पष्ट आदेश दिलेले नाहीत. दारू दुकानांबाबत एक्साईज विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मांढरे यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. मात्र आता सर्वच दुकाने सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी काही नियम आहेत. सर्व दुकानदारांवर सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक राहील. हा आदेश न पाळल्यास दुकान पुन्हा बंद करण्याच्या सूचना देण्यात येतील असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. दुकानात सुरक्षित अंतर ठेवण्याची आणि गर्दी होऊ न देण्याची जबाबदारी दुकानदारांची राहील असंही आदेशात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 2,52,675 जणांचा मृत्यू; अमेरिकेत परिस्थिती गंभीर
CoronaVirus News : "...हे तर आमच्याकडून देशासाठी केलेलं दान", मद्यप्रेमीचा 'हा' Video व्हायरल
CoronaVirus News : खोकल्याचं औषध घेत असाल तर वेळीच व्हा सावध, वाढू शकतो कोरोनाचा धोका?