पंचवटी - पंचवटीतील केबीएच दंत महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहातील तब्बल १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाची भीती पसरली आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थिनी कोरोनाग्रस्त असल्याच्या वृत्ताला महापालिकेच्या सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंके यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी वसतिगृह व्यवस्थापनाने ५२ विद्यार्थिनींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात काही विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आलेल्या होत्या. त्यानंतर मनपा पथकाने वसतिगृहात जाऊन पाहणी केली.
ज्या विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आल्या त्यांना वसतिगृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. गरज भासल्यास विद्यार्थिनींना पुढील उपचारासाठी मनपा कोविड सेंटरमध्ये हलविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाबाधित आढळून आलेल्या मुली बाहेरगावाहून आलेल्या असल्याचे महाविद्यालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले.