नाशिक - जर एखाद्या व्यक्तीला एकदा कोरोना होऊन गेला आणि आता तो पुन्हा होणार नाही, असे जर का तुम्हाला वाटत असेल, तर मग तुम्ही चूक करत आहेत. वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील भारताची सर्वोच्च संस्था इंडियन काैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या दाव्यानुसार, भारतात कोरोना विषाणूच्या रिइन्फेक्शनची सुमारे ५ टक्के प्रकरणे समोर आली आहेत म्हणजेच १०० कोरोनाबाधित झालेल्यांमधून ५ जणांना पुन्हा कोरोना बाधा झाल्याचे दिसून आले आहे.
कोरोना रिइन्फेक्शन म्हणजे कोरोनामुळे दुसऱ्यांदा संक्रमित होणे. आयसीएमआरने नमूद केले आहे की, जर एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल आणि १०२ दिवसांत ती व्यक्ती निगेटिव्ह होऊन पुन्हा पॉझिटिव्ह झाली, तर त्याला रिइन्फेक्शन म्हटले जाईल. कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरदेखील विषाणूचा छोटासा अंश शरीरात राहतो. याला पर्सिस्टंट व्हायरस शेडिंग असे म्हणतात. हे विषाणू फारच कमी प्रमाणात असतात, ज्यामुळे ताप किंवा लक्षणे दिसून येत नाहीत. अशी व्यक्ती इतरांनाही संक्रमित करू शकत नाही. मात्र, रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ शकतो. अशा प्रकरणात जीनोम ॲनालिसिसनंतरच हे रिइन्फेक्शन आहे की नाही हे सांगितले जाऊ शकते.
नवीन स्ट्रेनमुळे व्यक्ती होऊ शकते बाधित
रिइन्फेक्शन होण्यामागचे सर्वांत मोठे कारण म्हणजे कोरोना व्हायरसमधील बदल. त्यामुळे, हा विषाणू नवीन अंदाजात नवीन अवतारात समोर येत आहे. अशा परिस्थितीत, जर एखादी व्यक्ती प्रथम पॉझिटिव्ह होऊन निगेटिव्ह झाली असेल तर ती पुन्हा नवीन स्ट्रेनने इन्फेक्ट होऊ शकते. त्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रातही ‘डबल म्युटंट व्हायरस’ आढळला असून विषाणूमध्ये दोन मोठे बदल झाले आहेत.
दोन्ही डोस घेणारेही पॉझिटिव्ह पण
प्रत्येक व्यक्तीने अनावश्यक फिरणे टाळतानाच अत्यावश्यक तेव्हा बाहेर पडताना सर्वप्रकारची सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जोपर्यंत प्रत्येकाची लसीकरण होत नाही, तोपर्यंत प्रकरणांमध्ये वाढ आणि घट होत राहील. तोपर्यंत कोविड - १९ च्या प्रत्येक प्रोटोकॉलचे काटेकोरपणे अनुसरण करावेच लागणार आहे. नागरिकांनी मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबराेबरच वारंवार हात धुण्याकडे लक्ष देणे आणि काळजी घेणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. त्यामुळे दोन्ही डोस घेणारे जरी बाधित निघाले तरी त्याची तीव्रता कमी राहत असल्याचा दिलासा आहे.