नाशिक - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने रविवारी (दि.९) पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येने हजाराचा आकडा ओलांडला असून, तब्बल १०५६ बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, बाधित हजारपार असूनही सलग तिसऱ्या दिवशी बळीदेखील शून्य असल्याचा अल्पसा दिलासा प्रशासनासह आरोग्य विभागाला आहे.
जिल्ह्यात रविवारी बाधित आढळून आलेल्या १०५६ रुग्णांपैकी ८२२ बाधित नाशिक मनपा क्षेत्रातील, १६९ नाशिक ग्रामीणचे, मालेगाव मनपा ४, तर जिल्हाबाह्य ६१ असे रुग्ण बाधित आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना उपचारार्थी रुग्णांची संख्या साडेचार हजारांनजीक ४,४६५वर पोहोचली आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्रातील तब्बल ३४५९ रुग्ण, नाशिक ग्रामीणचे ८२२, मालेगाव मनपाचे २७, तर जिल्हाबाह्य १५७ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनामुक्ततेचे प्रमाणदेखील ९७ टक्क्यांच्या खाली घसरून ९६.८४ टक्के झाले आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्रात ९६.८४, नाशिक ग्रामीण ९६.८१, मालेगाव मनपा ९६.९८, तर जिल्हाबाह्य ९५.५० टक्के इतके प्रमाण आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्यादेखील २२५८वर पोहोचली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे १५६४, नाशिक मनपा ६८१, मालेगाव मनपा १३, असे अहवाल प्रलंबित आहेत.
सलग तिसऱ्या दिवशी बळी शून्य
जिल्ह्यात ७ जानेवारीला बाधित ८३७ असताना तसेच ८ जानेवारीला बाधित ११०३ वर पोहोचले असताना आणि त्यानंतर रविवारच्या दिवशी बाधित तब्बल १०५६ असतानाही बळींची संख्या शून्य राहिल्याने एकूण बळींची संख्या ८७६३ वर कायम आहे. कोरोनाबाधित हजाराच्या पटीत वाढत असले तरी बळी मात्र शून्य असल्याचा दिलासा जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेलादेखील मिळत आहे. त्यामुळे आता सध्या तरी बाधित वाढ रोखण्याचेच त्यांचे उद्दिष्ट आहे.