नाशिक - कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येत दिवसेंदिवस भर पडत आहेत. त्यातच सर्दी, खोकला, ताप, घसादुखी, अंगदुखी आणि अशक्तपणा अशी कोरोनासदृश लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. त्यामुळे हा सर्दी, खोकला आणि अंगदुखी कोरोनाची लक्षणे की वातावरण बदलामुळे झालेले व्हायरल इन्फेक्शन, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सद्यस्थितीत घरोघरी अशा प्रकारचे रुग्ण आढळून येत असून त्यातील अनेकजण चाचणी न करताच हा कोरोनाच असल्याचे गृहीत धरून त्यावरील उपचार घेत आहेत. सर्दी किंवा सामान्य ताप असला तरीही विलगीकरण करून डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी आणि उपचार करणे आवश्यक आहे.
मास्क आवश्यक, गर्दी टाळा
कोरोनाची रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्हिटी दर वाढत आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच विनाकारण गर्दीत जाणे टाळावे. तसेच लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.
वातावरण बदलामुळे व्हायरल इन्फेक्शन होऊन सर्दी आणि अंगदुखीसारख्या समस्या जाणवतात. मात्र, अनेकांना तीन दिवसात त्यापासून आराम मिळतो. आराम न वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. तसेच स्वत:चे आयसोलेशन करून घेत गर्दीत जाणे टाळावे, मास्क वापरावा व सकस आहार घ्यावा.
ओपीडीत गर्दी
कोरोनासदृश लक्षणे असलेल्या सर्दी, ताप, अंगदुखीच्या रुग्णांमध्येदेखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिका, शासकीय रुग्णालयांतील ओपीडी विभागात गर्दी वाढली आहे. कोरोना असो किंवा सामान्य ताप दोन्हींचा संसर्ग वेगाने होत आहे. त्यामुळे कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.
रुग्णसंख्येचा आलेख
१७ जानेवारी १७०२
१८ जानेवारी २५८९
१९ जानेवारी : २९९९
२० जानेवारी : २४१७
२१ जानेवारी : २९३९
-सर्दी, खोकला, ताप किंवा अंगदुखी असल्याने अंगावर काढू नये, किंवा मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन परस्पर औषध घेऊ नयेत. लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरोना चाचणी करून घ्यावी. ओमायक्रॉनचे फारसे धोके नसले तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
- डॉ. हेमंत सोनणीस,
अध्यक्ष, आयएमए, नाशिक शाखा.