नाशिक : जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के किरकोळ औषध विक्रेत्यांकडे कोरोनासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा असून, कोरोनाचा प्रभाव वाढला तरी तो पुरेसा होऊ शकतो, असा विश्वास औषध विक्रेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, औषध उत्पादक कंपन्यांनी कोरोनासाठी लागणाऱ्या औषधांच्या किमती पाच ते दहा टक्क्यांनी वाढविल्या आहेत. मात्र, विक्रेत्यांच्या नफ्यात घट करण्यात आली आहे. ग्राहकांना मात्र वाढीव किमतीचा फटका बसणार आहे.
मागील दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाचे संकट घोंगावत असून, दुसऱ्या लाटेत अनेक औषधांचा आणि इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. दुसरी लाट ओसरल्यानंतर स्थिती हळूहळू पूर्वपदावर आली असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने डोके वर काढले आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी फारसी गंभीर स्थिती नाही. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाबरोबरच वैद्यकीय क्षेत्रानेही तयारी केली असून, जिल्ह्यातील बहुसंख्य औषध विक्रेत्यांकडे या आजारासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा उपलब्ध आहे. फेब्रुवारी- मार्चमध्ये काय स्थिती होईल याचा निश्चित अंदाज नसला तरी औषधे मुबलक असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
ग्राहकांना बसणार फटका
कोरोनाची औषधे तयार करण्यासाठी लागणाऱ्या इतर कच्च्या मालाच्या किमती परदेशी कंपन्यांनी वाढविल्यामुळे या औषधांच्या किमतीमध्ये पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्या औषधांची मागणी वाढते तेथे विक्रेत्यांच्या नफ्याचे प्रमाण कमी केले जात असते. यामुळे अनेक कंपन्यांनी विक्रेत्यांचे नफ्याचे प्रमाण कमी केले आहे. ग्राहकांना मात्र वाढीव किमतीचा फटका बसणार आहे.
तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. केवळ सर्दी, खोकला असला, तर लगेच घाबरून जाण्याचे कारण नाही. सर्दी-खोकल्याबरोबरच ताप येणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यायला हवी. ही तीनही लक्षणे असली तर कोरोनाची चाचणी करणे आवश्यक आहे.
कोरोनाची तिसरी लाट येण्यास अनेकांचा निष्काळजीपणाही कारणीभूत ठरला आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर आपले अनेक बाबींकडे दुर्लक्ष झाले आहे. नागरिकांनी वेळीच काळजी घेतली, तर रुग्णसंख्या वाढण्यास अटकाव होऊ शकतो.
-धनंजय खाडगीर, औषधविक्रेता