सचिन सांगळे
नांदूरशिंगोटे : गत दोन वर्षांपासून सर्वजण कोरोनाच्या सावटाखाली जगत आहेत. त्यामुळे यावर्षी ग्रामीण भागातील गावागावांतील जत्रा भरतील, असे वाटत असतानाच पुन्हा ओमायक्रॉनचे संकट उभे राहिले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला तो मोलमजुरी करणाऱ्या तसेच गावच्या जत्रांवर अवलंबून असलेल्या तमाशा, ऑर्केस्ट्रा, मंडप डेकोरेटर, खेळणीसह विविध प्रकारचे दुकानदार या व्यावसायिकांना. सध्या यात्रांचा हंगाम असला तरी कोरोनामुळे यात्रा बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे व्यवसाय बंद असून या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
चंपाषष्ठीनंतर ग्रामीण भागातील यात्रा उत्सव सुरू होतो. यात्रा म्हटले की वर्षभरातील कामातून वेळ काढून देवदेवतांचे दर्शन आणि निखळ मनोरंजन एक हौस वेगळीच असते. यादरम्यान, नोकरी कामधंद्यासाठी गाव सोडून इतरत्र गेलेले ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहकुटुंब गावाला येत असतात. त्याचप्रमाणे सासुरवाशीण मुली-महिला आपल्या माहेराला, पाहुणे मोठ्या उत्साहाने यात्रेस येत असतात. दोन दिवसांच्या या यात्रेत देवदेवतांची पूजा, पुरणपोळीचा नैवेद्य, ढोल, लेझीम, छबिना, मिरवणूक, आरती, कुस्त्या व ऑर्केस्ट्रा, तमाशा असे मनोरंजनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले जातात. त्यामुळे जत्रेचा एक वेगळाच आंनद अनुभवयास मिळत असतो. गावातील रथ मिरवणुकीत आबालवृद्धांसह तरुण वर्ग तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी होतात. मात्र कोरोनाच्या संकटाने सर्वांचाच हिरमोड झाला आहे. २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तर यावर्षी ओमायक्रॉनचे संकट वाढत असल्यामुळे शासनाने पर्यटनासह विविध कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे यावर्षी ओमायक्रॉनमुळे या सर्वांवर विरजण पडले आहे. सध्या तालुक्यातील विविध भागांतील यात्रा, उत्सव सुरू झाले आहेत. मात्र, अगदी साध्या पद्धतीने हे सण, उत्सव साजरे करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील गावे या चार महिन्यांत खूप गजबजलेली असतात परंतु आता कोरोनामुळे जत्रा असूनदेखील गजबजलेली गावे अगदी शांत वाटत आहेत.
तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ
कोरोनामुळे जत्रा साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विविध खेळणी, फरसाण, भेळ, जेवण बनवणारे केटरर्सवाले, ढोल-लेझीम खेळ, झांज पथके, ऑर्केस्ट्रा हे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे आर्थिक संकटात सापडले आहेत. तर तमाशा कलावंतांवर तीन वर्षांपासून जत्राच भरत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या कलावंतांना शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे.