नाशिक - जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असली, तरी ओमायक्रॉन या विषाणूच्या प्रसाराचा वेग अधिक असला, तरी त्यात जीव गमावण्याचे प्रमाण तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षित लोकसंख्येच्या ८० टक्क्यांवर, तर दुसऱ्या डोसचे प्रमाण ४५ टक्क्यांनजीक पोहोचले असल्याने समाजात बऱ्यापैकी हर्ड इम्युनिटी (सामूहिक प्रतिकारशक्ती) तयार झाली आहे. त्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले, तरी मृत्यूचे प्रमाण अल्प राहणार असून, हर्ड इम्युनिटी वाढीसदेखील मदत होण्याची शक्यता आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत कमी होत आले होते. मात्र, वर्षाच्या अखेरच्या आठवड्यातील अंतिम टप्प्यात ओमायक्रॉन बाधित पहिला रुग्ण आढळल्याने आता नाशिकमध्ये कोरोनाचा फैलाव प्रचंड वेगाने होण्याची भीती दाटून आली आहे. ओमायक्रॉनचा फैलाव करण्याचा वेग प्रचंड असला, तरी त्यात बळी जाण्याचे प्रमाण कमी असल्याचा काहीसा दिलासा आहे. त्यामुळेच ओमायक्रॉनला नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण दक्षता मात्र पुरेपूर घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केले जात आहे.
कम्युनिटी स्प्रेडची चिन्हे
नाशकात आढळलेला पहिला बाधित रुग्ण असलेला मुलगा हा स्वत:हून तपासणीसाठी गेला नव्हता. त्यात कोरोनाची कोणत्याही प्रकारची लक्षणे नव्हती. केवळ पालक बाधित झाल्याने त्याचीदेखील चाचणी करण्यात आली. त्यात प्रत्येक दहापैकी दोन रुग्णांच्या रँडम सँपलिंगमध्ये त्याचे सॅम्पलदेखील पुण्याला एनआयव्हीकडे पाठवले होते. त्यात हा मुलगा ओमायक्रॉनने बाधित असल्याचे आढळले होते. रँडम सॅम्पलिंगमध्ये मुलगा ओमायक्रॉन बाधित आढळला असल्याने नाशकात आता ओमायक्राॅनचा कम्युनिटी स्प्रेड सुरू झाला असण्याची शक्यतादेखील तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.