नाशिक : जिल्हयातील निफाड तालुक्यातील ३० वर्षांच्या तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा तरुण परदेशातून आलेला नसून तो एका दुकानामध्ये कामाला आहे.
१२ मार्चला खोकला व ताप अशी लक्षणे असल्यामुळे तो तेथील खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी गेला होता. परंतु त्याला बरे न वाटले नाही म्हणुनतो दिनांक २५ मार्चला ग्रामीण रुग्णालय लासलगांव येथे उपचारासाठी गेला. न्युमोनियाची सदृश लक्षणे दिसत असल्यामुळे तो स्वत:च्या वाहनाने दिनांक २७मार्चला जिल्हा रुग्णालय नाशिक येथे उपचारासाठी दाखल झाला. त्याला जिल्हा रुग्णालय नाशिक येथील वैद्यकीय पथकाने तपासणी करून कोरोना विलगीकरण कक्षात दाखल केले. व त्याच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाला असुन तो कोरोना विषाणु बाधित असल्याचा निष्कर्ष अहवालात आलेला आहे.
सदर रुग्णाची प्रकृती स्थिर असुन त्याला कोरोना आजारासंबंधी येथील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडुन उपचार करण्यात येत आहे. उर्वरित कोरोना विलगीकरण कक्षातील दाखल आठ रुग्णांचे घश्याच्या स्रावाचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. सध्या कोरोना विलगीकरण कक्षांत ७ रुग्ण दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असुन ती सुधारत आहे.व त्यांना उद्या घरी सोडले जाणार आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संनियंत्रणानुसार कोरोना विषाणु पॉझीटीव्ह रुग्णाच्या घराच्या परिसरातील घरातील व्यक्तींचे साथरोग सर्वेक्षण पथकामार्फत सुरु करण्यात आले आहे. तसेच या सर्व परिस्थितीवर विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवेतील डॉक्टर, कर्मचारी कारोना साथीच्या नियंत्रणासाठी लक्ष ठेवून आहेत. नागरीकांनी घाबरुन जावु नये, घराबाहेर पडु नये, हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावे आपले हात नाक,तोंड,डोळे यांना लावण्याचे टाळा, असे आवाहन प्रशासनाने केले आहेत