जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली असून, गेल्या दोन लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेच्या संसर्गाची तीव्रता अधिक आहे. कोरोनाच्या अन्य लक्षणांप्रमाणेच सर्दी, खोकला, ताप, अंगदुखीसारखे लक्षणे या लाटेतही कायम असल्याने फ्ल्यू सारखीच लक्षणे सामान्यत: रुग्णांमध्ये दिसू लागले आहेत. १२ जानेवारी रोजी जिल्ह्यात १५४९ रुग्णसंख्या असतांना दहा दिवसांत २१ जानेवारी रोजी हीच संख्या २९३९ पर्यंत पोहोचली आहे.
दर दिवसा सरासरी पाचशेची वाढ
कोरोना रुग्णांची संख्या दर दिवशी साधारणत: पाचशेने वाढू लागल्यान आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष करून ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात म्हणजेच नाशिक शहर व शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागात रुग्णांची संख्या अधिक असून, याचाच अर्थ शहरात त्याचा संसर्ग वेगाने फैलावू लागला आहे.
पंधरा हजार रुग्ण विलीगीकरणात
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्याची तीव्रता कमी असल्याने रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. बहुतांशी रुग्णांनी घरातच विलीगीकरणात राहून उपचार घेण्यावरच भर दिला आहे. सध्या मालेगाव शहरात ३१७ तर नाशिक शहरात १० हजार ५०० रुग्ण घरात असून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हीच संख्या ४३०० इतकी आहे.
लहान मुलांनाही संसर्ग
जानेवारी महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवरही मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच झाला आहे. पूर्वीच्या दोन लाटेत लहान बालके मोठ्या प्रमाणात या संसर्गापासून बचावले होते. आता मात्र १ ते २१ जानेवारी या दरम्यान २४,४८२ बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्याचे पॉझिटिव्हिटीचे प्रमाणही १० टक्क्यांच्या आसपास आहे. मात्र बाल मृत्यूचे प्रमाण अगदी नगण्य आहे.