नाशिक : जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७ लाख २९ हजार १५६ इतक्या संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ४ लाख ६८ हजार २५१ नागरिक आतापर्यंत बाधित आढळून आले असून त्यातील ४ लाख ४५ हजार ९८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये गत दोन वर्षांतील काही विशिष्ट काळात प्रचंड वेगाने वाढ झाली होती. त्यामुळेच सर्दी, खोकल्याच्या थोड्या संशयानंतरही अनेक नागरिक चाचणी करून घेण्यास प्राधान्य देत होते. त्यामुळेच जिल्ह्यात गत दोन वर्षांत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या एकूण लाेकसंख्येच्या निम्म्यापेक्षा थोडी कमी आहे. अर्थात चाचणी जरी २७ लाखांहून अधिक नागरिकांची झाली असली तरी त्यात बाधित आढळून आलेल्या नागरिकांची संख्या पाच लाखांच्या आतच आहे. म्हणजेच चाचणीतून बाधित येणाऱ्या नागरिकांच्या संख्येचे प्रमाण हे एकूण चाचण्यांच्या तुलनेत एक पंचमांशपेक्षा कमी आहे.
६० हजार किट उपलब्ध
जिल्ह्यात दररोज साधारणपणे सुमारे ५ हजारांच्या आसपास चाचण्या सध्यादेखील सुरू आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच्या काळात या चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात येते. मात्र, साधारणपणे जिल्ह्यात किमान दहा ते बारा दिवसांचा तपासणी किटचा साठा सदैव उपलब्ध राहतो. त्यामुळे सध्यादेखील ६० हजारांहून अधिक किटचा साठा उपलब्ध आहे. तसेच दुसऱ्या लाटेवेळी अत्यंत वेगात रुग्णवाढ होत असतानाचा अल्प काळ वगळता अन्य काळात कधीही किटचा तुटवडा जाणवलेला नाही.
दररोज पाच हजार चाचण्या
मंगळवार - ५१९६
सोमवार - ५०६८
रविवार - ३५४५
शनिवार - ५३८०
शुक्रवार - ५४४७
गुरुवार - १०४९१
बुधवार -६६५९
सध्या सक्रिय रुग्ण - १३४५०
एकूण मृत्यू - ८८१८