नाशिक - कोरोना महामारीने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. कोणी पत्नी गमावली तर कोणी आई, कुणाचा दादा गेला तर कुणाचा मुलगा जग सोडून गेला. घरातील कर्ता पुरूष गेल्याने तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या पत्नींवर आली असून, पतीच्या पश्चात कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी या महिलांनी घेतली आहे. दुर्देवाचे दशावतार त्यांच्या नशिबी आले असले, तरी सारे दु:ख पचवून त्या खंबीरपणे कुटुंबासाठी उभ्या राहिल्या आहेत. जिल्ह्यात जवळपास १,३५१ महिलाच आता कुटुंबातील ‘कर्ता’ म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
आपापल्या क्षेत्रात ध्येयनिश्चिती गाठणाऱ्या किंवा व्यवसायात प्रगती करणाऱ्या महिलांची आठवण जागतिक महिला दिनी कर्तुत्ववान महिला म्हणून केली जाते. ध्यानीमनी नसतानाही अचानक दु:खाचा डोंगर कोसळला आणि संपूर्ण कुटुंबाचा आधारच निघून गेल्यानंतर या महिला कुटुंबाचा आधार बनल्या आहेत. शून्य ते १८ वर्ष वयाच्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी या महिलांवर आली आहे. कुटुंबातील वृद्ध सासू-सासरे यांचादेखील काही महिला सांभाळ करत आहेत. पतीच्या पश्चात काही थोड्याच महिलांना त्यांची नोकरी मिळू शकली, मात्र अशा अनेक महिला आहेत की त्या उपजीविकेसाठी स्वत: कष्ट करत आहेत.
पतीच्या निधनानंतर सर्वकाही पहिल्यापासून सुरू करून कुटुंबाला सावरणे ही बाब सोपी नाही. सामाजिक, कौटुंबिक घडी बसवताना आर्थिक गणितही जुळवावे लागत असल्याने त्यांना रोजच जगण्याचा संघर्ष करावा लागत आहे. कोरोनानंतर तर माणसाचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे. या बदलत्या परिस्थितीत मुलाबाळांचा सांभाळ करण्यासाठी या महिला उभ्या राहिल्या आहेत.
व्यापक समाजजीवनात या महिलांचा संघर्ष सामाजिक पटलावर कदाचित कधीच उमटणार नाही. मात्र, पतीनंतरच्या बदलत्या आयुष्यात प्रत्येक क्षण संघर्ष करत मुलाबाळांचा सांभाळ करणाऱ्या या मातांचा संघर्ष रणांगणातील रणरागिणीपेक्षा नक्कीच कमी नाही. कुटुंबातील कर्त्या पुरुषालाही जेथे कुटुंब सांभाळताना तडजोडी कराव्या लागतात, अशावेळी या महिलांना किती अडचणींचा सामना करावा लागत असेल, याचीही कल्पना येते.
शासनाकडून मदतीचा हातभार
अचानक वैधव्य नशिबी आलेल्या जिल्ह्यातील जवळपास १,३५१ महिलांना शासनाकडून किरकोळ आधार मिळत आहे. त्यांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांना शासनाकडून प्रतिमाणसी १,१०० रूपये सानुग्रह अनुदान मिळत आहे.