नाशिक - जिल्ह्यात रविवारी (दि.22) एकूण 412 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. जिल्ह्यात एकूण 674 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे आता जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 30 हजार 9 इतकी झाली आहे.. दिवसभरात उपचारार्थ दाखल 7 रुग्ण दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा आता 768वर पोहचला. मृतांमध्ये नाशिकमधील 2 तर ग्रामिण, मालेगावातील प्रत्येकी 2 आणि जिल्ह्यबाहेरील 1 रुग्णाचा समावेश आहे. या सात मयतांमध्ये दोन पुरुष असून त्या दोघांचे वय पन्नाशीच्या पुढे होते तर उर्वरित चारही महिला जेष्ठ नागरिक होत्या. शनिवारच्या तुलनेत शहरासह जिल्हयातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. यामुळे काही अंशी दिलासा मिळाला. नाशिक शहरात एकूण 362 तर ग्रामीणमध्ये 246 रुग्ण आढळून आले तर मालेगावात 65 रुग्ण मिळून आले. मागील दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी मालेगावात दुपटीने रुग्ण मिळाले. आणि जिल्ह्यबाहेरचा 1रुग्ण मिळून आला. जिल्ह्यात अद्याप 24 हजार 307 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 4 हजार 934 कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. आगामी काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्रमणाचा धोका अधिक वाढण्याची श्यक्यता आहे. आगामी गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. शहरातील बाजारपेठेत नागरिकांची विविध वस्तू खरेदीसाठी झुंबड उडत आहे. यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा होताना दिसत आहे.सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी तोंडावर मास्क लावत परस्परांत 'डिस्टन्स' बाळगणे खूप गरजेचे आहे. जिल्ह्यातील 890 अहवाल अद्याप प्रलंबित आहे. जिल्ह्यातील अद्याप एकूण 1 लाख 15 हजार 462 लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठवून झाले आहेत. त्यापैकी 84 हजार 563 लोक निगेटिव्ह आढळून आले.