नाशिक : ऑक्सिजन बेडसाठी थेट महापालिकेत आलेेल्या कोरोना बाधित रुग्णाला बुधवारी तातडीने नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती नियुक्त केली आहे.कोरोना रुग्णाला सार्वजनिक ठिकाणी आणलेल्या दीपक डोके या कार्यकर्त्यावर पोलिसांनी साथ रोग प्रतिबंधक कायदा आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सिडकोतील एका बाधिताला महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन, न्यू बिटको तसेच डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बेड मिळाला नाही. त्यामुळे त्यास डोके याने थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आणले होते. आणखी एक बाधितही महापालिकेसमोर आला होता. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दोन बाधितांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील एक बाधित पळून गेला तर ऑक्सिजनची पातळी ३६ असल्याचे सांगितलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. संबंधित रुग्ण कोणत्या रुग्णालयात गेला होता. त्याने कोणाशी संपर्क साधला, महापालिकेच्या सेंट्रलाइज बेड सिस्टीम्ससाठी नियुक्त हेल्पलाइनवर संपर्क साधला होता काय, याची चाैकशी होणार आहे. प्रकरण अंगलट, गुन्हा दाखलकोराेना बाधिताला ऑक्सिजन सिलिंडरसह महापालिकेत घेऊन येऊन त्याच्या जीविताला तसेच अन्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी दीपक डोकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
coronavirus: नाशिक महापालिकेत आलेल्या रुग्णाचा ऑक्सिजन बेडअभावी मृत्यू, प्रशासनाकडून चौकशी समिती; ‘त्या’ स्टंटबाज कार्यकर्त्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 5:29 AM