नाशिक- नाशिक शहरातील गोविंद नगर भागात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच रुग्णाच्या निवासस्थानापासून तीन किलोमीटर परिघात नागरिकांना निर्बंध घालण्यात आले आहेत. मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हे निर्बंध घातले आहेत. आगामी 14 दिवस हे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार 3 किलोमीटर परिघात कोणीही बाहेरील व्यक्ती या क्षेत्रात जाऊ शकणार नाही.इतकेच नाही तर या भागातील नागरिक बाहेर पडू शकणार नाही, असे आयुक्त गमे यांनी आत्ता जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे. नाशिक जिल्ह्यात गेले अनेक दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, गेल्या रविवारी निफाड तालुक्यातील एका संशयिताचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेने सर्व भागात आरोग्य तपासणी केली होती. आता थेट शहरात रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.
coronavirus : कोरोनाबाधित रुग्णाच्या घरापासून तीन किलोमीटर परिसर सील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 11:00 PM