नाशिक: कांदा विक्रीसाठी सकाळी गजबजणारी बाजारपेठ आणि सर्वच मुख्य रस्त्यासह लहान रस्त्यावर देखील नजरेला एकही मनुष्य दिसत नसल्याने लासलगावी जनता कर्फ्यु सुरू झाला आहे.
आज सकाळी वर्तमानपत्र विक्री करणारे विक्रेते यांनी भल्या पहाटे वर्तमानपत्राचे वितरण केले. तसेच दुध विक्रेत्यांनी कालच रात्री व आज सकाळी लवकर दुध वितरीत केले. बस स्थानकावर देखील सुनसुनाट होता. रेल्वे स्थानक देखील निर्मणुष्य झाले आहे. बस स्थानकावर प्रवाशांची व विद्यार्थी यांची मोठी गर्दी असते ते सुने पडले होते.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता जनता कर्फ्यू आज सकाळी 7.00 ते रात्री 9.00 वाजेच्या दरम्यान कोणीही घरातून बाहेर पडू नका किंवा सोसायटीत, रस्त्यावरही फिरू नका आणि घरातील सदस्य शिवाय इतर कोणालाही भेटू नका. अत्यावश्यक सेवा व तातडीची वैद्यकीय मदत याशिवाय कोणीही बाहेर पडू नये . केवळ पोलीस, मीडिया प्रतिनिधी, डॉक्टर सफाई कर्मचारी याखेरीज कोणीही बाहेर पडू नका, अन्यथा संबंधितांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात येईल तसेच कोणीही बंद आहे की नाही हे सुद्धा पाहण्यासाठी घराबाहेर पडू नये. असे आवाहन कालपासून विविध सोशल साईटवर लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी केले आहे.