गेल्या तीन वर्षांपासून शहर बस वाहतुकीची चर्चा होत आहे. आता ही बस सुरू होणार अशी चिन्हे असताना केवळ राज्य शासनाकडून वेळेत परवानगी मिळत नसल्याने मुहूर्त पुढे ढकलण्याची नामुष्की आली आहे. महापालिकेने ही सेवा २६ जानेवारीपासून पाच टप्प्यात सुरळीत सुरू करण्यासाठी तयारी केली. पहिल्या टप्प्यात पन्नास डिझेल बस रस्त्यावर आणण्याची तयारी होती. नाशिकरोड आणि पंचवटी डेपोतून नऊ मार्गांवर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, आता ही तयारी सुरू असताना तब्बल वर्षभरापासून बससेवेची फाइलच राज्य शासनाच्या परिवहन मंत्रालयाकडे फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
महापालिकेने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुमुहूर्त शाेधला असला तरी अजूनही प्रवासी बस ऑपरेशनचा परवाना मिळालेला नाही. तो मिळाला तरी नियमानुसार महापालिकेला बस तिकिटांच्या दराला अंतिम मान्यता मिळवण्यासाठी आरटीएकडे (प्रादेशिक परिवहन प्राधिकरण) अर्ज करावा लागणार आहे. या आरटीएचे अध्यक्ष विभागीय आयुक्त असतात. त्यांच्याकडे तिकीट दराचा प्रस्ताव पाठवताना परिवहन खात्याने दिलेला बस ऑपरेशनचा परवाना जोडावा लागतो. तोच नसल्याने या प्राधिकरणाकडे अर्ज कसे करणार, असा प्रश्न महापालिकेसमोर आहे.
एक ते दोन दिवसात बस ऑपरेशनचा परवाना मिळाला तरी त्यानंतर महापालिकेने तातडीने आरटीएकडे प्रस्ताव पाठवला पाहिजे तो सादर केल्यानंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरणातील सर्व सन्मानीय सदस्यांना वेळ मिळायला हवा, त्यानंतरच प्राधिकरणात तिकीट दरांना औपचारिक मान्यता मिळू शकेल. परंतु प्रजासत्ताक दिनापर्यंत ही कार्यवाही शक्य नसल्याने आता बस सेवेला तात्पुरता थांबा मिळाला आहे.
इन्फो...
बसची रात्री चाचणी
महापालिकेने तयार केलेले सॉफ्टवेअर आणि बस याची सांग घालून बससेवा चालते किंवा नाही हे तपासण्यासाठी चाचणी सुरू करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी काही बस घेऊन सॉफ्टवेअरच्या चाचणीनुसार त्यांचे ट्रॅकिंग आणि त्या वेळेनुसार त्या थांब्याला पोहोचता किंवा नाही हे तपासण्यात आले आहे. सॉफ्टवेअरची चाचणी बहुतांश पूर्ण झाली आहे.