नाशिक - शहरातील उद्यानांची होत चाललेली बकाल स्थिती, अपुरा कर्मचारीवर्ग, एकाच उद्यान निरीक्षकाकडे सहाही विभागाचा कार्यभार, वाहतूक बेटांसह दुभाजकांची झालेली दुरवस्था या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पश्चिम प्रभाग समितीच्या सभापती व कॉँग्रेसच्या नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनी शनिवारी (दि.१६) महापालिका मुख्यालयातील उद्यान विभागाला टाळे ठोकले. यावेळी, विभागाच्या कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन करत निषेधही नोंदविला.पश्चिम प्रभाग समिती सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी शनिवारी गनिमी काव्याने महापालिकेत आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश मिळविला आणि शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांनाही चकवा देत थेट तिस-या मजल्यावरील उद्यान विभागाचे कार्यालय गाठले. डॉ. पाटील यांनी सर्वप्रथम उद्यान विभागात कार्यरत असलेल्या प्रभारी उद्यान अधिक्षकासह सर्व कर्मचा-यांना बाहेर काढले. यावेळी, विभागाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याची तयारी असल्याचे उद्यान अधिक्षक बी. यु. मोरे यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला शेवटचा दिवस असल्याचे सांगत आपल्याला त्यात ओढू नये, अशी विनंती डॉ. पाटील यांना केली आणि ते आपल्या कक्षात निघून गेले. त्यामुळे, डॉ. पाटील यांनी उद्यान विभागातीलच आतील एका कक्षाला कुलूप ठोकत आंदोलन केले. त्यानंतर, विभागाच्या प्रवेशद्वारावर येत त्यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन करत उद्यान विभागाच्या कामकाजाबद्दल आक्षेप नोंदविला. यावेळी, डॉ. पाटील यांनी सांगितले, शहरात ४८९ उद्याने आहेत. त्यापैकी २९० उद्याने ही खासगी मक्तेदारांना तीन वर्षांसाठी देखभालीकरीता देण्यात आली आहे. उर्वरित १९९ उद्यानांची महापालिका कर्मचा-यांमार्फत देखभाल केली जात आहे. उद्यान विभागात २१६ कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगितले जाते. परंतु, प्रत्यक्षात कर्मचारी वर्ग नेमका कुठे काम करतो, याचा उलगडा होत नाही. उद्यान निरीक्षक पांडे यांच्याकडे सहा विभागांचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. ठेकेदारांमार्फत चालविल्या जाणा-या उद्यानांची स्थिती गंभीर आहे. महासभांमध्ये वारंवार प्रश्न उपस्थित करुनही प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. वृक्ष लागवडीचे उद्दिष्टय पूर्ण करणेही विभागाला शक्य झालेले नाही. दुभाजक, वाहतूक बेटांची अवस्था तशीच गंभीर आहे. त्यामुळे उद्यान विभाग कायमस्वरूपी बंदच करून टाकावा, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.
नाशिक महापालिकेच्या उद्यान विभागाला कॉँग्रेस नगरसेविकेने ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 2:24 PM
पश्चिमच्या सभापतींचे आंदोलन : उद्यानांच्या दुरवस्थेकडे वेधले लक्ष
ठळक मुद्देशहरात ४८९ उद्याने आहेत. त्यापैकी २९० उद्याने ही खासगी मक्तेदारांना तीन वर्षांसाठी देखभालीकरीता देण्यात आली आहेठेकेदारांमार्फत चालविल्या जाणा-या उद्यानांची स्थिती गंभीर