----------------------------
सोयगाव भागात साचले पावसाचे पाणी
मालेगाव : गेल्या तीन दिवसांपासून शहर परिसरात पाऊस पडत आहे. या पावसामुळे सोयगाव नववसाहत, अयोध्यानगर, कलेक्टर पट्टा भागात पावसाचे पाणी साचले आहे. नागरिकांना चिखल व पाण्यातून वाट काढावी लागत आहे. पावसाच्या पाण्याची निचऱ्याची सोय नसल्यामुळे व भुयारी गटार नसल्यामुळे पाणी घरांमध्ये शिरत आहे. महापालिकेकडून कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही. परिणामी नागरिक हतबल झाले आहेत.
--------------------------------------
गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठ सजली
मालेगाव : अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थीनिमित्त शहरातील बाजारपेठ सजली आहे. शहरातील सटाणा नाका, मोसम पूल, कॅम्प रोड, जुना आग्रा रोड परिसरात श्री गणेशाच्या विविध प्रकारच्या आकर्षक मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. तसेच स्टेट बँक चौक परिसरात पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती विक्रीला आल्या आहेत. श्री गणेशाच्या स्थापनेच्या सजावटीसाठी विविध प्रकारचे वस्तू व पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
--------------------------------------
गणेश मंडळ मंडप तपासणीसाठी पथके
मालेगाव : सार्वजनिक सण-उत्सवप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप तपासणीसाठी उच्च न्यायालयाने पथके नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवानिमित्त मंडपांची तपासणी करण्यासाठी महसूल, पोलीस, महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकात प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, नायब तहसीलदार विकास पवार, उपअभियंता एस. पी. चौरे, छावणीचे पोलीस निरीक्षक एस. पी. गायकवाड, दुसऱ्या पथकात तहसीलदार चंद्रजीत राजपूत, नायब तहसीलदार हांडोरे, प्रभाग अधिकारी हरीश डिंबर, कॅम्पचे सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील, तिसऱ्या पथकात धान्य वितरण अधिकारी दत्तात्रय शेजूळ, अव्वल कारकून नितीन विसपुते, उपअभियंता सचिन माळवाळ, पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात, तिसऱ्या पथकात विशेष कार्यकारी दंडाधिकारी अर्चना खेतमाळीस, मंडळ अधिकारी एल. एम. निकम, कनिष्ठ अभियंता मंगेश गवांदे, पोलीस निरीक्षक डी. के. ढुमणे, पाचव्या पथकात सहायक आयुक्त वैभव लोंढे, नायब तहसीलदार डी. बी. वाणी, कनिष्ठ अभियंता एम. एम. गांगुर्डे, पोलीस निरीक्षक डी. एच. भदाणे आदींचा समावेश आहे.
---------------------------------------
डास प्रतिबंधक औषध फवारणीची मागणी
मालेगाव : शहर व परिसरात चिकनगुनिया व डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढत आहे. साथीच्या आजारांमध्ये देखील वाढ झाली आहे. पावसामुळे पाण्याचे डबके साचले आहे. परिणामी डासांची उत्पत्ती वाढली आहे. महापालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाने शहरात व नववसाहत भागात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.