नाशिक- महापालिकेच्या व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळ्यांचे आता ई-लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय महापालिकेच्या जागांवर जाहिरात फलकांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात उत्पन्न वाढीचे मोजकेच परंतु महत्वाचे पर्याय सुचवण्यात आले आहेत. महापालिकेचे ६१ शॉपिंग सेंटर असून त्यात २०७४ गाळे आणि ८५१ ओटे आहेत. या गाळ्यांची मागणी आणि वसुली सध्या मॅन्युअल पध्दतीने होत असली तरी ती आता ऑनलाईन करण्यात येणार आहे.
यात गाळ्यांची मागणी, वसुली, थकाबाकी असा सर्व तपशील असेल परंतु तात्काळ बिले देखील दिले जातील. संगणकीय पध्दतीने बिले वेळेत मिळाल्यानंतर वेळेत वसुली होईल त्याच बरोबर या गाळेधारकांना आवश्यक त्या सुविधा देण्यात येतील त्याच प्रमाणे थकबाकीदार आणि रिक्त गाळे ई-लिलाव पध्दतीने देण्यात येईल असे आयुक्तांनी नमूद केले आहे.दरम्यान, शहरातील विजेच्या खांबांवर जाहिराती लावणे आणि अन्य मार्गांमधूनही उत्पन्न वाढवले जात आहेत. महापालिकेच्या जागांवर जाहिरात फलक लावण्यासाठी अनुमती देण्यात येणार असून त्यासाठी नवीन जागांचा शोध घेतला जात आहे. अर्थात शहराचे विद्रुपीकरण होणार नाही अशा प्रकारच्या जागांचा शोध घेण्यात येईल तसेच बेकायदा फलक देखील हटवण्यात येतील, असे आयुक्तांनी अंदाजपत्रकात म्हंटले आहे.