दरम्यान, म्युकॉर्मायकॉसीससारख्या आजारावर उपचारासाठी लागणारी इंजेक्शन्सचीही आता टंचाई भासत असून, ते अवाच्या सवा दराने विकले जात आहेत.
कोरोनाबाधितांवर उपचार करताना अनेक प्रकारची इंजेक्शन केवळ रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी वापरली जात आहेत. मात्र, त्यातून वेगळेच दुष्परिणाम जाणवत आहेत. रुग्णाचा जीव वाचतो, परंतु कोरोनामुक्त झालेल्या या रुग्णाची प्रतिकार शक्ती कमी होत असल्याने, म्युकॉर्मायकॉसीससारखे आजार हाेत आहेत. त्यामुळे अनेकांना ब्लॅक फंगसमुळे डोळे, नाक, जबडा, मूत्रपिंड, मेंदू अशा ठिकाणी आघात होऊ शकतो. विशेषत: मधुमेह असणाऱ्यांना अनेकांना डोळे गमवावे लागले आहेत. काेरोनाच्या पहिल्या लाटेतही अशा प्रकारचे रुग्ण आढळले होते. मात्र, आता दुसऱ्या लाटेत ही संख्या अधिक आहे, असे नाशिकमधील वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे त्यासाठी लागणारे लापोजेमल एमपेाटेरसीन बी या इंजेक्शनचे डोस घ्यावे लागतात, परंतु हे इंजेक्शनही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. त्यामुळे सुमारे अडीच हजार रुपयांचे हे इंजेक्शन सुमारे चार ते पाच हजार रुपयांना दिले जात आहे.
इन्फो...
महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले की, कोरोनाबाधितांवर उपचार केल्यानंतर अनेकांवर त्याचे दुष्परिणाम जाणवतात. त्यामुळे महापालिकेने गेल्या वर्षी महापालिकेच्या वतीने पोस्ट कोविड सेंटर सुरू केले होते. त्या मागे हाच उद्देश होता, परंतु त्यावेळी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी पाठ फिरविली. मात्र, ब्लॅक फंगससारखे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत असून, त्यामुळेच कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रित होऊ लागल्यानंतर पुन्हा पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली.
कोट...
म्युकॉर्मायकॉसीस या आजाराचे अनेक रुग्ण आढळत असून, उपचारासाठी दाखल आहेत. नाकात बुरशीसारखा रक्तमिश्रित चिकट स्राव येतो. त्यामुळे होणारा त्रास मेंदूपर्यंत जाऊ शकतो. त्यावर उपाय म्हणून इंजेक्शन्स आहेत, तसेच शस्त्रक्रिया करून बुरशीजन्य भाग काढून घेणे गरजेचे आहे, अन्यथा जीवावर बेतू शकते.
- डॉ.शब्बीर इंदोरवाला, नाशिक