नाशिक : कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी नगरसेवक निधीतून महापाालिकेने खरेदी केलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे चिनी बनावटी असल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. महापालिकेने कोरिअन कंपनीकडे मागणी नोंदविली होती. तिचे एक उत्पादन केंद्र चीनमध्ये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुढील बैठकीत या संदर्भात सविस्तर माहिती देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
सोमवारी स्थायी सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात रेमडेसिविर, प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर, खासगी रुग्णालयात नियुक्त समन्वय अधिकाऱ्यांची कार्यपद्धती, सातपूर येथे ईएसआय रुग्णालयाचे करोना रुग्णालयात न झालेले रूपांतर अशा अनेक मुद्द्यांवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
रुग्णालयात खाटा मिळत नसल्याने रुग्णांची प्राणवायूची निकड भागविण्यासाठी महापालिकेने मध्यंतरी एकूण १२५० प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचे निश्चित केले. यातील ६२५ यंत्र नगरसेवकांकडे, तर ६२५ पालिकेच्या काळजी केंद्रात ठेवली जातील. काही यंत्र प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने क्रमांक टाकून प्रत्येक नगरसेवकाला पाच यानुसार वितरण सुरू केले. त्यांच्यामार्फत आपापल्या प्रभागातील गरजवंतांना ती मोफत देण्याचे नियोजन आहे. यंत्र हाती पडल्यानंतर कोरिअन कंपनीची सांगितले जाणारी यंत्र प्रत्यक्षात चिनी बनावटीची असल्याचे मनसेचे सलीम शेख यांनी लक्ष वेधले. मध्यंतरी पालिकेच्या रुग्णालयात टाकीत गळती होऊन प्राणवायूअभावी २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. चिनी बनावटीचे यंत्र वापरताना काही दोष उद्भवल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यंत्र खरेदी करताना ती नेमकी कुठली आहेत याची पडताळणी झाली नसल्याचा आक्षेप नोंदविला गेला. वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी वाढत्या मागणीमुळे बाजारात ही यंत्र मिळत नसताना पालिकेने ही मागणी नोंदविली. कोरिअन कंपनीची यंत्र मिळणार होती. या कंपनीचे एक उत्पादन केंद्र चीनमध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले. सभापती गिते यांनी यंत्र खरेदी करण्याआधी सुस्थितीत राहण्याचा कालावधी आणि तत्सम बाबींवर चर्चा झाली होती. या संदर्भात सविस्तर माहिती पुढील सभेत सादर करण्याचे त्यांनी सूचित केले.
सातपूर येथील ईएसआय रुग्णालयात करोना रुग्णालय सुरू करण्यात कालापव्यय होत आहे. खुद्द पालिका आयुक्तांनी आदेश देऊनही वैद्यकीय विभागाकडून दिरंगाई सुरू असल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. जुने नाशिक भागात लसीकरण केंद्रांची संख्या कमी असल्याने नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रामवाडी येथील लसीकरण केंद्रात सकाळी सहा वाजेपासून रांगेत उभे राहणाऱ्या १०० नागरिकांना ११ वाजता लस मिळणार असल्याचे सांगितले जाते. कोरोना काळात खासगी रुग्णालयांमध्ये अधिकची देयके आकारून नागरिकांची सुमारे ५० कोटींची लूट झाल्याचा आरोप करण्यात आला. शासकीय दराने आकारणी व्हावी, यासाठी महापालिकेने खासगी रुग्णालयात लेखा परीक्षक नियुक्त केले. परंतु, ते कधीही रुग्णालयात नसतात. रुग्णालयांशी त्यांनी हातमिळवणी केली असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी शेख यांनी केली. यावर लेखापाल बी. जी. सोनकांबळे यांनी लेखा परीक्षकांना नियुक्तीवेळी रुग्णालयात हजर राहण्याचे सूचित केल्याचे स्पष्ट केले.