मालेगाव : शहरातील आग्रारोड दुरुस्ती, बायोमायनिंग ठेका, स्वच्छता कामाचे आऊट सोर्सिंग, घरपट्टी सर्वेक्षण, सौर उर्जा प्रकल्प, गिरणा पंपिंग मशिनरी दुरुस्तीचा ठेका महासभेने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसारच निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या. या प्रक्रिया काळात कुठल्याही मक्तेदाराला अग्रीम वेतन अदा केले नाही. असे असताना महापालिकेची लूट केल्याचा माझ्यावरील आरोप बिनबुडाचा आहे. सोशल मीडियातून बदनामी करून बदलीसाठी दबाव आणला जात आहे. या आधीच राज्य शासनाकडे बदलीसाठी अर्ज दिला आहे. सौर ऊर्जा व गिरणा पंपिंग दुरुस्तीचा ठेका मनपाच्या आर्थिक हिताचा नसल्याने दोन्ही टेंडर रद्द केले असल्याची माहिती महापालिका आयुक्त दीपक कासार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
गुरूवारी मनपा आयुक्त दीपक कासार यांच्यावर आणलेल्या अविश्वास ठराव प्रस्तावाच्या महासभा होण्यापूर्वी आयुक्त कासार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मालेगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्यानंतर शासनाने आयुक्त पदाची जबाबदारी सोपविली होती. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. धार्मिक व स्वयंसेवी संस्थांनी मदत केल्यामुळे मालेगाव पॅटर्न तयार झाला. कायद्याच्या चौकटीत राहून कामकाज केले. बहुतांशी विषय व प्रस्ताव महासभा मांडत असते. प्रशासन केवळ अंमलबजावणीचे काम करते. स्थायीच्या विषय मंजुरीनंतरच आर्थिक बाब येत असते. आग्रारोड, बायोमायनिंग ठेका, स्वच्छता कामाचे आऊट सोर्सिंग, घरपट्टी सर्वेक्षण आदि विषयांना महासभा व स्थायीने मंजुरी दिली आहे; मात्र तरीदेखील यातून महापालिकेची आर्थिक नुकसान होत असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे असेल तर ही पाचही कामे आहे त्या स्थितीत थांबविण्यात येतील, असेही कासार यांनी सांगितले.
-----------------------
गैरहजेरीचा आरोप निराधार
महापालिकेची आर्थिक स्थिती व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी मुंबई येथे वारंवार जावे लागले. परिणामी कार्यालयात गैरहजर असल्याचा आरोप निराधार आहे. सध्या कोरोनाची रुग्ण संख्या वाढली आहे. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना युद्ध पातळीवर केल्या जात आहेत. शासनाचा आदेश आल्यास बदली करून महापालिकेचा पदभार सोडणार असल्याची माहिती आयुक्त कासार यांनी दिली.