नाशिक : दुहेरी खुनातील संशयितांना न्यायालय आवारात पाण्याच्या बाटलीतून मद्य दिल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष तसेच नगरसेवक प्रकाश लोंढे यांना न्यायाधीश एस़ आऱ भोर यांनी रविवारी (दि़१९) न्यायालयानी कोठडी सुनावली़ लोंढे यांच्या वकिलांनी न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे़ न्यायालय आवारात मद्य देण्यास विरोध करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास लोंढे यांनी शिवीगाळ करून दमदाटी तसेच अॅट्रॉसिटीची धमकी दिली होती़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्यातील अटक टाळण्यासाठी प्रारंभी जिल्हा न्यायालय व त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता़ मात्र जामीन फेटाळल्याने लोंढे बुधवारी (दि़१५) सरकारवाडा पोलीस ठाण्यात हजर झाले होते़ रविवार (दि. १९) लोंढे यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना रविवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते़ यावेळी गुन्ह्याचे तपास अधिकारी संदीप कांबळे यांनी लोंढे हे तपासात सहकार्य करीत नसल्याने पोलीस कोठडी वाढविण्याचे मागणी केली़ मात्र न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली़ यानंतर लोंढे यांचे वकील अॅड़ कासलीवाल यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असता पोलिसांनी जबाबासाठी एक दिवसाची मुदत मागितली़ मात्र न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळत तत्काळ जबाब देण्याचा आदेश दिला़ त्यानुसार पोलिसांनी जामिनास हरकत घेतल्याने न्यायाधीश भोर यांनी लोंढे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला़ त्यामुळे त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे़
नगरसेवक लोंढे यांची कारागृहात रवानगी
By admin | Published: June 19, 2016 11:20 PM