नाशिक : शहरातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याच्या इराद्याने गुन्हेगारांची व त्यांना मदत करणाऱ्या राजकारण्यांची धरपकड करणाऱ्या पोलिसांनी गुरुवारी (दि.१८) फरारी नगरसेविका पुत्र धीरज शेळके याच्या सातपूर येथील घराची व कॉलेजरोडवरील कार्यालयाची झाडाझडती घेतली.पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या नेतृत्वाखाली उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी शहरातील भाई-दादांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. गुन्हेगारांची भीती कमी होण्यासाठी अनेक सराईत गुन्हेगारांची शहरातील रस्त्यावरून आणि त्यांच्या प्रभावाखालील भागातून वरात काढली आहे. गुजरातमधील कंपनीत गुंतवलेल्या भांडवलाच्या वसुलीसाठी कंपनीतील कमिशन एजंटचे अपहरण करून तीन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या संशयित तथा सातपूरच्या महिला नगरसेवक उषा शेळके यांचा मुलगा धीरज अशोक शेळके याच्या कॉलेजरोडवरील बिगबाजार समोरील प्लॉट खरेदी-विक्रीच्या कार्यालयाची उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या पथकाने कसून तपासणी केली. तसेच धीरज शेळके याच्या सातपूर येथील घराचीही पोलिसांनी तपासणी केली. या झाडाझडतीत पोलिसांच्या हाती नेमके काय लागले? याबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली असली तरी लवकरच धीरज शेळके याच्या मुसक्या आवळण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
नगरसेवक पुत्राच्या कार्यालय, घराची झडती
By admin | Published: August 19, 2016 1:07 AM