इंदिरानगर : प्रभाग क्रमांक ३० मध्ये ठिकठिकाणी पालापाचोळा साचला असल्याने परिसरास बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे प्रभागाचे नगरसेवक दीपाली कुलकर्णी यांनी मनपा पूर्व विभागाचे स्वच्छता अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा देताच प्रभागील रस्त्यांची साफसफाई करण्यात आली.गेल्या वीस दिवसांपासून प्रभाग क्रमांक तीसमधील राजसारथी सोसायटी, चिंतामणी कॉलनी, सन्मित्र वसाहत, आत्मविश्वास कॉलनी, महारुद्र कॉलनी, रथचक्र सोसायटी, गणराज कॉलनी, गंधर्वनगरी, वनसंपदा सोसायटी, परबनगर यांसह या भागातील मुख्य अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पालापाचोळा साचला होता. त्यामुळे परिसरास बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत संबंधित घंटागाडी ठेकेदाराला वारंवार सांगूनही पालापाचोळा उचलला जात नव्हता. अखेर प्रभागाचे नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी पालापाचोळा उचलला न गेल्यास आरोग्य विभागाच्या दालनातआंदोलनाचा इशारा लेखी पत्राद्वारे दिला होता. त्याची दखल घेत गेल्या तीन दिवसांत प्रभागात घंटागाडीचा ट्रॅक्टरद्वारे पालापाचोळा उचलला गेला. रविवारी पूर्व भागातील सात घंटागाडींद्वारे कचरा उचलून प्रभागातील रस्ते स्वच्छ करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नगरसेवकाने इशारा देताच रस्ते चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 1:07 AM