नाशिक : १९९२ पासून महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाल्यानंतर गेल्या पाच पंचवार्षिक काळात आठ नगरसेवकांना विधानसभेचीही पायरी चढण्याचे भाग्य लाभले. त्यात महापौरपदापर्यंत झेप घेतलेल्या कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांना तर आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली. आमदारकी लाभूनही नगरसेवकपदाचा मोह मात्र आठही जणांना सोडता आला नाही. महापालिकेत सन १९९९ ते २००२ या कालावधीत कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी पहिली महिला महापौर बनण्याचा बहुमान मिळविला. त्यानंतर २००२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शोभा बच्छाव पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आल्या. पुढे २००४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शोभा बच्छाव यांनी उमेदवारी केली आणि माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव अहेर यांचा पराभव करत त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. आमदारकीबरोबरच नंतर डॉ. बच्छाव यांच्याकडे आरोग्य खात्याचे राज्यमंत्रिपदही चालून आले. मंत्रिपद, कॉँगे्रसचे शहराध्यक्षपद भूषविणाऱ्या डॉ. बच्छाव यांनी मात्र नगरसेवकपदाचा राजीनामा न देता सभागृहाचे सदस्यपद कायम ठेवले. त्यावेळी एकाच व्यक्तीकडे अनेक पदांमुळे टीकाही झाली होती. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे नगरसेवक असलेले माजी महापौर वसंत गिते यांनी बाजी मारत आमदारकी मिळविली. तर कॉँग्रेसकडून नगरसेवकपद भूषविणाऱ्या निर्मला गावित यांच्याही पदरात इगतपुरी मतदारसंघातून आमदारकी पडली. गिते-गावित यांनाही आमदारकी मिळूनही नगरसेवकपदाचा मोह सोडता आला नाही. सन २००७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर भाजपाच्या चार नगरसेवकांना आमदारकीची लॉटरीच लागली. सन २००५ ते २००७ या काळात महापौरपद भूषविणारे बाळासाहेब सानप, २००९ ते २०१२ या काळात उपमहापौरपद भूषविणाऱ्या प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर यांचे सुपुत्र डॉ. राहुल अहेर यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करत आमदारकी प्राप्त केली. या चौघांनी आमदारकी मिळूनही नगरसेवकपदाचा राजीनामा न देणे पसंत केले. याशिवाय, सन २०१२ च्या निवडणुकीत जनराज्य या पक्षाची स्थापना करत नगरसेवकपदी निवडून आलेले आणि नंतर भाजपात दाखल झालेले अपूर्व हिरे यांनीही शिक्षक मतदारसंघातून विजयश्री मिळवित विधान परिषदेची पायरी चढली. सन २०१२-१७ या काळात तब्बल पाच नगरसेवकांना आमदारकी लाभली.
नगरसेवक, आमदारकी अन् मंत्रिपदही...!
By admin | Published: January 18, 2017 11:29 PM