सातपूर :- महिनाभरापूर्वी मनपाच्या घंटागाडीखाली सापडून मयत झालेल्या बावीस वर्षीय रोशनी जयस्वाल हिच्या मृत्यूस घंटागाडी ठेकेदारच जबाबदार असून ‘त्या’ ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले आहेत.वेळ पडल्यास येत्या महासभेत आंदोलन देखील छेडू असा इशाराही यावेळी देण्यात आला.
सातपूर विभागीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमप्रसंगी मयत रोशनी जयस्वाल हिच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत करण्यात आली. यावेळी आमदार सीमा हिरे,सातपूर सभापती रवींद्र धिवरे,नगरसेवक दिनकर पाटील,सलीम शेख,योगेश शेवरे,दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते. महिनाभरापूर्वी जॉगिंगला गेलेली रोशनी केदारनाथ जयस्वाल (वय २२ वर्ष रा.कामगारनगर, पाईपलाईन रोड ) ही युवती ग्लेनमार्क कंपनी समोरील रस्त्यावर वॉकिंग करत होती. दरम्यान त्याचवेळी महापालिकेच्या एका नादुरुस्त घंटागाडीचा ताबा सुटल्याने घंटागाडी अंगावर आली. यात तिता दुर्दैवी मृत्यू झाला. रोशनी घरात कमावती असल्याने कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न सुरू केले होते.
दरम्यान , नगरसेवक सलीम शेख यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करणे गरजेचे असल्याचे सांगितले. आमदार सीमा हिरे,नगरसेवक दिनकर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
फोटो :- रोशनी जयस्वाल हिच्या कुटुंबीयांना ठेकेदाराच्यावतीने पाच लाखाची मदत सुपुर्द करताना आमदार सीमा हिरे,नगरसेवक दिनकर पाटील,सलीम शेख,रवींद्र धिवरे,दीक्षा लोंढे,योगेश शेवरे आदी.
(आर: १७घंटागाडी)