नाशिक : मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार माजी नगरसेवकपुत्र आकाश ओमप्रकाश शर्मा ऊर्फ साबळे (२५, रा़विनयनगर, नाशिक) यास दोन वर्षांसाठी शहर व जिल्ह्यातून पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि़२७) तडीपार केले़ १ जानेवारी २०१६ रोजी भारतनगरमधील जागा खाली करण्यासाठी तेथील रहिवाशांवर गोळीबार केल्याची तसेच दंगल केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आकाश साबळेवर गुन्हा दाखल आहे़ याबरोबरच विनयनगरमध्ये स्त्रिया व मुलींचे अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमान्वये आकाशवर गुन्हे दाखल आहेत़ शहर परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई सुरू केली असून, त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली असून, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी पूर्ण केली. तडीपाराच्या काळात ठाणे जिल्ह्यातील कसारा येथे राहणार असलेल्या आकाश साबळे यास पोलिसांनी कसारा येथे सोडून दिले आहे़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.२० सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाईपरिमंडळ एकमध्ये वर्षभरात २० सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, आणखी १७ सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीच्या प्रकरणाची चौकशी आहे़ तडीपारांमध्ये शरद पगारे, विशाल सिरसाठ, केतन मकासरे, जॉर्ज साळवे, मुजफ्फर शेख, दिलावर शेख, गणेश गायकवाड, संतोष जगधने, अर्जुन पगारे, पंकज नरवडे, मृणाल घोडके, पप्पी ऊर्फ समीर शेख, नईम अब्बास शेख, फिरोज खान, किशोर बरू, सद्दाम कुरेशी, निखिल बेग, बुºहाण शेख, विक्की वाघ व आकाश साबळे यांचा समावेश आहे़