नाशिक : तपोवनातील ‘रामसृष्टी’च्या नावाखाली भ्रष्टाचार झाला असून, सगळ्यांनी पैसे खाल्ले आहेत. मुळात तेथे ‘रामसृष्टी’ आहेच कोठे? गेल्या कुंभमेळ्यात ही जागा साधू-महंतांच्या खालशांना निवासासाठी देण्यात आली होती. यंदा तेथे ‘रामसृष्टी’चे नाव करून नुसते उद्यान उभारून ठेवले, तेसुद्धा धड नाही, असा आरोप अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत श्री ग्यानदास यांनी सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांदेखत केला. चार महिन्यांनंतर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशकात दाखल झालेल्या महंत ग्यानदास यांनी आज सायंकाळी साधुग्रामची पाहणी केली, त्यानंतर त्यांनी यासंदर्भात आगपाखड केली. महंत ग्यानदास व महंत रामसनेहीदास यांनी याबाबत सांगितले की, गेल्या कुंभमेळ्यात सध्या जेथे रामसृष्टी उद्यान आहे, तेथे साधूंच्या खालशांना निवासासाठी जागा देण्यात आली होती. यंदा मात्र तेथे उद्यान उभारून ठेवले आहे. या कामाच्या नावाखाली बऱ्याच लोकांनी पैसे खाल्ले. या जागेबाबत प्रशासनाला विचारले, तर प्रशासनाने ही जागा पूररेषेच्या अंतर्गत येत असल्याने ती साधुग्रामसाठी दिली नसल्याचे स्पष्टीकरण दिले. यासंदर्भात आम्ही साधू २००८ पासून ही जागा साधुग्रामसाठी मिळावी, यासाठी प्रयत्न करीत आहोत; मात्र त्याऐवजी तेथे उद्यान उभारण्यात आले, त्याचीही अवस्था धड नाही. (प्रतिनिधी)
‘रामसृष्टी’च्या नावाखाली भ्रष्टाचार
By admin | Published: June 05, 2015 12:13 AM