येवला : यंदा निवडणूक खर्चाच्या मर्यादेवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी पालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला राष्ट्रीयीकृत बँकेत स्वत:च्या नावाने नवीन खाते उघडून त्याद्वारे खर्चाचा ताळमेळ ठेवण्याचे बंधन निवडणूक आयोगाने घातले असून, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पालिकेत पासबुकची झेरॉॅक्स प्रतदेखील द्यावी लागणार आहे. शिवाय नोंदणीकृत पक्षाचा एबी फॉर्म नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत अर्थात २९ आॅक्टोबरपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंतच द्यावे लागणार आहे. असे महत्त्वपूर्ण बदल निवडणूक आचारसंहितेच्या माध्यमातून केले असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. १७ आॅक्टोबरपासूनच आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली असून, या आचारसंहितेचा धसका राजकीय पक्षासह सर्वांनीच घेतला असून, सार्वजनिक ठिकाणी एकही फलक शहरात दिसत नाही. फ्लेक्स बोर्डच्या गर्दीमुळे शहराचे विद्रूपीकरण किमान पालिका निवडणुकीपुरते तरी थांबले आहे. नगरसेवक पदासाठी दोन सूचक लागणार आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी राजकीय पक्षाची अधिकृत उमेदवारीसाठी एबी फॉर्म जोडण्याची सवलत होती. परंतु यंदा नव्याने नियमात बदल झाला असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत संबंधित राजकीय पक्षाचा एबी फॉर्म जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. नगराध्यक्ष अथवा नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना विहित नमुन्यातील उमेदवारी अर्जासोबत चार प्रतिज्ञापत्र सादर करावी लागणार आहेत. यात दोनपेक्षा अधिक अपत्य नाही, मालमत्तासंबंधी, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे, माहिती खरी असणे याचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जासोबत चार प्रतिज्ञापत्रे आता स्टॅम्पपेपरवर करण्याची गरज असणार नाही. हे शपथपत्र आता साध्या कागदावर सक्षम प्राधिकारी अर्थात नोटरी अथवा तहसीलदार यांच्यासमोर सध्या कागदावर करण्याची सवलत निवडणूक आयोगाने दिली आहे. (वार्ताहर)
खर्चाचा ताळमेळ एकाच खात्यातून
By admin | Published: October 21, 2016 1:28 AM