सिडको : गेल्या काही दिवसांपासून सिडको व अंबड भागांसह परिसरात डेंग्यूसदृश रु ग्णांच्या संख्ये वाढ होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. परिसरातील बहुतांशी रुग्णालयांमध्ये डेंग्यूसदृश रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे समजते. या संदर्भात जनजागृती करण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांनी प्रभागात फिरत असून, याबाबत नागरिकांना प्रबोधन करीत आहे.सिडकोतील प्रभाग क्रमांक २८ मध्ये शिवसेना नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्याकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे.यासाठी महापालिकेच्या मलेरिया विभागाचे कर्मचारी सामील असून, यात प्रामुख्याने प्रभागात फिरून ज्या नागरिकाच्या घरात गेल्या अनेक दिवसांपासून साठलेले पाणी फेकून देण्यात आले. याबरोबरच काही नागरिकांच्या घरात गच्चीवर असलेले टायर हटविण्यात आले. तसेच नागरिकांनी घरातील फ्रीज, फ्लॉवर पॉट, रिकाम्या कुंड्या याची स्वच्छता नियमित करण्याचे आवाहन करण्यात आले. यापूर्वी शहरातही काही भागांत नगरसेवकांनी पत्रके वाटप करून जनजागृती मोहीम राबविली आहे.प्रभागातील उपेंद्रनगरसह इतर भागात डेंग्यूबाबत असलेल्या तक्रारींबाबतची पाहणी करून त्या ठिकाणी फवारणी करण्यात आली. महापालिकेच्या उदासीन भूमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून सिडको व अंबड भागात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.नागरिकांकडून स्वच्छतेची मागणीसिडको व अंबडसह परिसरांत मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश रुग्ण आढळत असतानाही महापालिकेच्या वतीने कोणतीही उपाययोजना राबविली जात नसल्याने मनपाच्या या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. मनपाने आतातरी दखल घेण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
डेंग्यूबाबत नगरसेवकांकडून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:58 AM