इंदिरानगर : पूर्व प्रभाग समितीच्या मासिक सभेत प्रभाग क्रमांक ३० मध्ये गेल्या काही महिन्यांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याची तक्रार करून नगरसेवक श्याम बडोदे व दीपाली कुलकर्णी यांनी सभागृह ठिय्या आंदोलन केल्याने सभेत वातावरण तप्त झाले. सभापती भालेराव यांनी तत्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र अधिकाºयांनी व्यवस्थित प्रतिसाद न दिल्याने दोन्ही सदस्यांनी तब्बल अडीच तास कामकाज रोखून धरले. अखेर आठ दिवसांत पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.पूर्व प्रभाग सभा सभापती सुमन भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी गेल्या आठ वर्षांपासून प्रभाग क्रमांक तीसमधील चार्वाक चौक ते जॉगिंग ट्रॅक दरम्यान असलेल्या विविध अपार्टमेंट, सोसायटी व कॉलनीमधील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, मुकणे धरणातून थेट जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा सुमारे एक वर्षापासून सुरू करण्यात आला आहे. तरीही सिडको विभागातील पाणीपुरवठा विभाग व पूर्व विभागातील पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांच्या असमन्वयामुळे परिसरात कृत्रिम पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाल्याची तक्रार श्याम बडोदे व डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केली. जोपर्यंत पाणीप्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत सभागृह सोडणार नाही, असे म्हणत सभागृहात ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यांना अन्य सदस्यांनी साथ देत त्यांनीदेखील ठिय्या आंदोलन सुरू केले.या आंदोलनाची दखल घेत प्रभाग सभापती भालेराव यांनी विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांना अतिरिक्त आयुक्त संदीप नलवाडे, कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांच्याशी संपर्क करण्याच्या सूचना केल्या, परंतु धारणकर यांचा भ्रमणध्वनी दोघांनीही उचलला नाही. त्यामुळे त्या दोघांनाही भ्रमणध्वनीवर संदेश पाठवण्यात आला त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या सर्व सदस्यांनी जोपर्यंत दोन्ही अधिकारी येत नाही तोपर्यंत सभागृह न सोडण्याचा निर्णय जाहीर केला.अडीच तास होऊनसुद्धा सभागृहातून सदस्य बाहेर निघत नसल्याचे पाहून महापालिका प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. अडीच तासांनी नलवाडे व चव्हाणके या दोघाही अधिकाºयांनी येऊन पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, द्वारका परिसरात ठिकठिकाणी खोदकाम करून धातूरमातूर पद्धतीने खड्डे बुजविण्यात आल्याने रस्त्यावर माती पडून आहे. अनेक ठिकाणी जलवाहिनीतून पाण्याची गळती होत असल्याची तक्रार अर्चना थोरात यांनी केली.गौतमनगर परिसरात दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, महिला सफाई कर्मचारी नगरसेवकांशीसुद्धा उद्धटपणे बोलत असल्याची तक्रार आशा तडवी, अनिल ताजनपुरे यांनी केली. इंदिरानगर परिसरात उघड्यावर मांसविक्री केली जात असून, त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता टाळता येत नाही, अशी तक्रार अजिंक्य साने यांनी केली. यावेळी २८ लाखांच्या विविध कामांना यावेळी मंजुरी देण्यात आली.
पूर्व प्रभाग समितीत नगरसेवकांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:50 PM
पूर्व प्रभाग समितीच्या मासिक सभेत प्रभाग क्रमांक ३० मध्ये गेल्या काही महिन्यांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याची तक्रार करून नगरसेवक श्याम बडोदे व दीपाली कुलकर्णी यांनी सभागृह ठिय्या आंदोलन केल्याने सभेत वातावरण तप्त झाले.
ठळक मुद्देकृत्रिम पाणीटंचाई : अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणावर टीका