वडांगळी : सीमेवर अहोरात्र जागून देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी देशातील सव्वाशे कोटी जनता खंबीरपणे उभी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी मुंबई जिल्हा बँकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रावसाहेब दानवे, मुंबई जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, आमदार सुनील राऊत आदि मान्यवर उपस्थित होते. मुंबई येथील सहकारमहर्षी स्वर्गीय वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी उरी हल्ल्यातील शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.देशाच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना एकटे पडू देणार नाही. देश भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा असून, त्यांना काही मदत लागल्यास निसंकोचपणे सांगण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी सहकारमंत्री देशमुख, सहकार राज्यमंत्री पाटील, आमदार दरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. मुंबई जिल्हा बँकेच्या वतीने महाराष्ट्रातील चार शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख तर मुंबई को-आॅपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने प्रत्येकी दोन लाख रुपये मदतीचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. (वार्ताहर)
देश सैनिकांच्या पाठीशी
By admin | Published: October 28, 2016 12:00 AM