सिडको : लेखानगर येथे वाहतूक बेटावर रणगाडा लावण्याच्या विषयावरून सध्या सुंदोपसुंदी सुरू आहे. येथील नगरसेवक प्रविण तिदमे यांनी रणगाड्यासाठी आग्रह धरला असला तरी याच भागातील नगरसेवक शिवाजी चुंभळे यांचा मात्र त्यास विरोध आहे. त्यामुळे प्रशसनाची अडचर झाली आहे. महामार्ग रूंदीकरणात लेखा नगरचा रस्ता अरु ंद झाल्याने अपघाता मध्ये वाढ झाली आहे. चौकात रणगाडा लावुन सुशोभिकरण करण्या पेक्षा नागरिकांचा प्रश्न महत्वाचा आहे, रणगाडा बसविण्याला विरोध नाही परंतु चौकातील रस्ता रु ंदीकरण झाल्यानंतर जागा उरली तर रणगाडा बसवावा अशी चुंभळे यांची भूमिका आहे. यासंदर्भात नागरीकांनीच जानेवारी महिन्यातच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती याचिकाकर्ते अजिंक्य चुंभळे यांनी दिली.
सिडकोतील लेखा नगर चौकात सीएसआर मधून भारतीय सैन्याने वापरलेला रणगाडा बसविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार महापालिकेने संरक्षण खात्याशी पत्रव्यवहार देखील केला. संरक्षण खात्याने विनामुल्य रणगाडा देण्यास मान्यता दिली आहे. मात्र, महापालिकेने चौकात काम सुरू केल्यानंतर स्थानिक नगरसेवक आणि रहीवाशांचाच विरोध वाढल्याने काम ठप्प झाले आहे. आता या प्रभागाचे नगरसेवक प्रविण तिदमे यांनी रणगाडा वेळेत न बसवणाऱ्या अधिकारी तसेच विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी अशीि मागणी केली आहे.
यासंदर्भात अजिंक्य चुंभळे यांनी सांगितले की, याठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपूल बनवतांना केलेल्या चुकीमुळे वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांचा जीव धोक्यात आलेला आहे.तशा अनेक घटना वारंवार घडलेल्या आहेत. उड्डाणपूल झाल्यानंतर या ठिकाणी अपघातांच्या प्रमाणात झालेली वाढ चिंताजनक असून त्यात अनेक वाहनचालकांचे बळी गेलेले आहेत. याशिवाय आगोदरच महामार्गाच्या विस्तारीकरणात महामार्गलगत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या बालभारती कार्यालयासह स्थानिक रहिवाशांच्या जागा गेलेल्या आहेत.
यासंबंधीची याचिका देखील उच्च न्यायालयात दाखल असून बालभारती देखील याचिकाकर्ते झालेले आहेत. मुळातच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाचे नियोजन करतांना केलेल्या चूकीवर पांघरून घालायचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या चुकीमुळे सामान्य माणसांचे बळी जात असतांना त्याच ठिकाणी चौक सुशोभिकरणाचा प्रस्ताव देऊन नागरिकांचा जीव अधिक धोक्यात घालण्याचा प्रयत्न कितपत योग्य आहे, असा प्रश्नही चुंभळे यांनी केला आहे.