नाशिक : मद्यसेवनाचे खोटे कारण दाखवून विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाºया एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनीस ग्राहक न्यायालयाने दणका दिला असून, अपघातात कायमचे अपंगत्व आल्याने पाच लाख व रुग्णालयीन उपचारासाठी एक लाख अशी सहा लाखांची भरपाई देण्याचे आदेश नाशिकच्या ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश मिलिंद सोनवणे यांनी एचडीएफसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले आहेत़ चांदशी येथील रहिवासी प्रवीण बबन गणोरे यांनी एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनीची सर्व सुरक्षा प्लस ही विमा पॉलिसी काढलेली होती़ या पॉलिसीचा कालावधी २ डिसेंबर २०१६ ते १ डिसेंबर २०१९ असा असून, त्या अंतर्गत आठ विविध प्रकारचे संरक्षण देण्यात आलेले होते़ १५ मार्च २०१७ रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या कारला चेतन पावडे याने कट मारला़ गंगापूर धरण डावा तट कालव्याच्या पाटमोरीवर पावडे उभे असल्याने त्यास जाब विचारला असता त्याने शिवीगाळ व धक्काबुकी करून गणोरे यांना पाटात फेकून दिले़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गणोरे यांच्यावर हॉस्पिटलमध्ये शस्त्रकिया करण्यात आली़ यामध्ये त्यांचा जीव वाचला असला तरी त्यांना कायमचे अपंगत्व आले, त्यांनी पोलीस ठाण्यात पावडेविरोधात गुन्हा दाखल केला़गणोरे यांनी एचडीएफसी इन्श्युरन्सकडे कायमच्या अपंगत्वासाठी ५ लाख, उपचारासाठी एक लाख व कर्ज सुरक्षेसाठी ३ लाख ४४ हजार ७७२ रुपयांच्या विम्यासाठी दावा केला असता त्यांनी मद्याच्या नशेत असल्याचे खोटे कारण दाखवून विम्याचा दावा नामंजूर केला़ याबाबत गणोरे यांनी अॅड़ एम़एस़ आंबाडे यांच्यामार्फत ग्राहक न्यायालयात दावा दाखल केला़ विमा कंपनीने कोणताही पुरावा नसताना डॉ़ देसाई यांचे डिस्चार्ज कार्डवरील हिस्टरी आॅफ अल्कोहोल कन्झम्पशन असा रिमार्क पाहून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न असल्याचे समोर आले़ तसेच गणोरे यांना आलेले कायमस्वरूपी अपंगत्व हे अल्कोहोल कन्झम्पशनमुळे नाही तर पावडे नावाच्या व्यक्तीशी झालेल्या बाचाबाचीनंतर धक्का दिल्याने पाटात पडून झाल्याचे न्यायालयासमोर सिद्ध झाले़ त्यामुळे तक्रारदाराचा विमा नाकारण्याचा दावा विधिसंगत नसून कंपनीने सेवा देण्यात कमतरता केली असल्याचे समोर आले व न्यायालयाने भरपाईचे आदेश दिले़कार खरेदी करताना एचडीएफसीकडून घेतलेल्या कर्जाबरोबरच ‘सर्व सुरक्षा प्लस’ विमाही काढलेला होता़ कारला कट मारल्याचा जाब विचारल्याने मला मारहाण करून पाटात फेकून दिल्याने अपंगत्व आले़ तर विमा कंपनीने मद्यसेवन केलेले नसतानाही विमा नाकारला़ त्यामुळे ग्राहक न्यायालयात धाव घेतली अन् मला न्याय मिळाला़ मी अजूनही बेडवर असून न्यायालयाचे आदेश विमा कंपनीकडे मेल व कुरियरने पाठविले आहेत़; मात्र अद्यापपर्यंत विम्याची रक्कम मिळाली नसून पाठपुरावा सुरू आहे़ - प्रवीण गणोरे, चांदशी, नाशिक़
विमा नाकारणाऱ्या कंपनीस न्यायालयाचा दणका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:52 AM