आश्रमशाळा महाराष्ट्र शासनाची मान्यताप्राप्त असल्याचे जाहिरातीद्वारे प्रसिद्ध करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशी २८ पदे भरण्यासाठी संस्था चालक गोपाळ मधुकर पवार, रा. अंबेजोगई, बीड यांनी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले होते. परंतु, कोरोना काळामुळे समाजकल्याण विभागाने भरती प्रवेशासाठी परवानगी दिली नसल्याने संस्थाचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयासमोर सुनावणी दरम्यान अध्यक्षांच्या वकिलांनी कागदपत्रे सादर करून संबंधित संस्था खोटी नसून तिला शासनाची मान्यताप्राप्त झाली असल्याची कागदपत्रे सादर केली. परंतु, समाजकल्याण विभागाकडून पदभरतीची कुठलीही मान्यता नसल्याने राज्यभरातून शेकडो युवक - युवती मुलाखतीसाठी इगतपुरी येथे दाखल झाले होते. सरकारी वकिलांनी त्याबाबत युक्तिवाद केला. यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी संस्थाचालकास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. इगतपुरी न्यायालयाचे न्यायाधीश प्र. प्र. गिरी यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी वकील म्हणून सुवर्णा महाले यांनी काम पाहिले, तर संस्था अध्यक्षाच्या बाजूने ए. डी. मेमन यांनी बाजू मांडली. याप्रसंगी इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दिवटे, आबासाहेब भगरे, सचिन बेंडकुळे उपस्थित होते.
‘त्या’ आश्रमशाळेच्या अध्यक्षांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:17 AM