नाशिक : न्यायालयीन व सरकारी कामासाठी लागणाऱ्या कोर्ट फी स्टॅम्पची पाच आणि दहा रुपयांची तिकिटे मंगळवारपासून नागरिकांना न्यायालयातील अॅडव्होकेट सोसायटीमध्ये उपलब्ध झाल्याची माहिती सोसायटीचे व्यवस्थापक शशिकांत मुठाळ यांनी दिली आहे़ ‘न्यायालयीन कामासाठीच्या तिकिटांचा तुटवडा’ असे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रसिद्ध केले होते़ या वृत्ताची दखल घेऊन कोषागार कार्यालयाने सोसायटीला ही तिकिटे उपलब्ध करून दिली आहेत़न्यायालयात व सरकारी कार्यालयात अर्ज देताना पाच व दहा रुपयांची तिकिटे लावावी लागतात. ही तिकिटे स्टॅम्पवेंडर आणि वकिलांच्या सोसायटीत वकील, तसेच सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध असतात़ गेल्या चार महिन्यांपासून पाच व दहा रुपयांची तिकिटे मिळत नसल्याने वकिलांबरोबरच सामान्य नागरिकांना मनस्तापाबरोबरच आर्थिक झळही मोठ्या प्रमाणावर सोसावी लागत होती़ मंगळवारी कोषागार कार्यालयाने न्यायालयातील नाशिक डिस्ट्रीक्ट अॅडव्होकेट सोसायटीला पाच रुपयांची ४५००, तर दहा रुपयांची ३६०० तिकिटे उपलब्ध करून दिली. सोसायटीत ही तिकिटे उपलब्ध झाल्याने नागरिकांबरोबरच वकिलांनीही समाधान व्यक्त केले़ कोषागार कार्यालयाने पाच व दहा रुपयांच्या तिकिटांचा पुरवठा कायम ठेवावा, अशी इच्छाही नागरिकांनी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)