नाशिक : भारतीय वन्यजीव कायद्यानुसार अतिसंरक्षित सुची-१ मधील मांडूळ सर्पासह गोड्या पाण्यात राहणाऱ्या मऊ पाठीच्या कासवाची तस्करी करणाºया १९ तस्करांच्या टोळीचा जामीन अर्ज येवला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावत न्यायालयीन कोठडी जैसे-थे ठेवली. या खटल्यावर पुढील सुनावणी येत्या सोमवारी (दि.२२) होणार आहे. ठाणे येथील एक सहायक पोलीस निरिक्षकासह पुण्याच्या पोलीस कर्मचा-याचाही टोळीत समावेश आहे.भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमांनुसार वन्यजीवांची तस्करी अजामीनपात्र गुन्हा ठरतो. अंधश्रध्देला खतपाणी घालत त्यापोटी वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्नात असलेल्या १९ तस्करांच्या मुसक्या नाशिक पुर्व वनविभागाच्या येवला वनपरिक्षेत्र व वणी दक्षता पथकाने बांधल्या. या तस्करीचे धागेदोरे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर अहमदनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांपर्यंतही पोहचल्याचे तपासातून पुढे आले. येवला वनपरिक्षेत्रात असलेल्या सत्यगावमधील संशियत सोमनाथ रामनाथ पवार (२२) यासह एका अल्पवयीन मुलाला वनक्षेत्रपाल संजय भंडारी व त्यांच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून केलेल्या चौकशीतून एकापाठोपाठ एक संशियतांची माहिती समोर येत गेली. ठाणे येथील रबाळे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास बाळासाहेब चव्हाणके आणि पुणे येथील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यातील रायटर दीपक गोवर्धन धाबेकर, आयटी कंपनी मालक निलेश रामदास चौधरी (रा. चाकण), अंबरनाथ येथील बांधकाम व्यावसायिक महेश हरिश्चंद्र बने यांच्यासह अन्य सर्व संशियतांभोवती वनविभागाच्या पथकाने फास आवळला. दक्षता पथकाचे वनक्षेत्रपाल बशीर शेख यांच्या पथकाने अहमदनगर येथून संशयित आरोपी ज्ञानेश्वर वाबळे व निखिल गायकवाड यांना बेड्या ठोकल्या. यावेळी निखिलच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याच्या घरात दडवून ठेवलेल्या अवस्थेत अतिसंरक्षित वन्यजीव कासव आढळून आले होते. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, या सर्व संशियतांच्या जामीनासाठी वकिलांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता. मात्र वनविभागाने त्यांच्या जामीनास विरोध करत संशयितांना जामीन मंजूर झाल्यास तपास थंडावेल आणि तस्करीची साखळी पुर्णपणे फोडणे अशक्य होईल असा युक्तीवाद सरकारी पक्षातर्फेअॅड. ए. एस. वैष्णव यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत तस्कर टोळीचा जामीन नामंजूर करत त्यांची न्यायालयीन कोठडी कायम ठेवली.
दक्षता पथकाचे वनक्षेत्रपाल बशीर शेख यांच्या पथकाने अहमदनगर येथून संशयित आरोपी ज्ञानेश्वर वाबळे व निखिल गायकवाड यांना बेड्या ठोकल्या. यावेळी निखिलच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याच्या घरात दडवून ठेवलेल्या अवस्थेत अतिसंरक्षित वन्यजीव कासव आढळून आले होते.