मातोरी : मातोरी ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांवर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असताना, सदस्यपद रद्द झालेल्या मीराबाई पंडितराव कातड यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश आणला असून, वॉर्ड क्रमांक एकमध्ये पोटनिवडणूक घेऊ नये, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मातोरी ग्रामपंचायतीच्या राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्यावरून नऊ पैकी सहा सदस्यांचे सदस्यत्व विविध कारणांस्तव रद्द झाले असून, सध्या तीनच सदस्य कामकाज पहात आहेत. परिणामी त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या कामकाजावर होत आहे. अशा परिस्थितीत मीराबाई कातड यांनी उच्च न्यायालयातून सदस्यत्व रद्द करण्याच्या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या चार झाली आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरू झालेली असताना मीराबाई कांतड यांनी जिल्हाधिकाºयांना पत्र देऊन वॉर्ड क्रमांक एकमध्ये पोटनिवडणूक घेऊ नये तसे केल्यास न्यायालयाचा अवमान होईल, असे कळविले आहे. मीराबाई कातड यांनी ग्रामपंचायत कारभार पुन्हा एकदा सांभाळावा, अशी मागणी गावातील पोलीस पाटील रमेश पिंगळे, बाळू चारोस्कर, पांडुरंग चारोस्कर, शिवाजी बर्वे, राजाराम पिंगळे, रमेश चारोस्कर, गोकुळ पिंगळे आदींनी केली आहे.
मातोरीच्या कातड यांना न्यायालयाचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:04 AM