पिंपळगाव बसवंत : महाविद्यालयीन तरुणी दिपिका अजय ताकाटे (वय १७) हिचा गळा घोटून खून करूनअहेरगाव पालखेड डाव्या कालव्यात मृतदेह फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली असून ४८ तासात पिंपळगाव पोलिसांनी तरुणीचा चुलत भाऊ संशयित विक्रम गोपीनाथ ताकाटे (रा.कारसुळ) व सहकारी मित्र सौरभ दत्तात्रय निफाडे (रा.खडकजांब) या दोघांच्या मुसक्या आवळत जेरबंद केले आहे.पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारसुळ येथील विद्यार्थीनी कु. दिपिका अजय ताकाटे ही पिंपळगाव बसवंत येथील महाविद्यालयात १२वी वाणिज्य शाखेत शिकत होती. सकाळी ती नियमितपणे बसने पिंपळगाव बसवंत येथे प्रवास करत असे. सोमवारी (दि.१५) कॉलेज संपल्यावर ती घराकडे परतलीच नसल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. पण ती सापडली नाही. मंगळवारी ( दि.१६) सकाळी दहा वाजेच्या सुमारास आहेरगाव येथील पालखेड डावा कालव्यात तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पिंपळगाव बसवंत येथून ती आहेरगाव येथे गेलीच कशी, तसेच पालखेड डावा कालवा बंद केल्याने दि १५ रोजी या कालव्यात अवघे पाच फुटांपर्यंत पाणी असल्याने ती बुडेलच कशी अशा शंका व्यक्त करण्यात येऊन तिचा घातपात झाला असावा, या बाबतीत पोलीस तपास करत असताना पिंपळगाव पोलिसांनी सूत्रे फिरवीत मुलीचा चुलत भाऊ विक्रम गोपीनाथ ताकाटे रा.कारसुळ व सहकारी मित्र सौरभ दत्तात्रय निफाडे रा.खडकजांब या दोघांची चौकशी केली. त्यांना पोलीसी हिसका दाखवला असता त्यांनी खुनाची कबुली दिली. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासकामी नाशिक ग्रामीणचे उपअधीक्षक अर्जुन भोसले यांचेसह पिंपळगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पटारे, पप्पू देवरे, रवि बारहाते, मिथुन घोडके, दुर्गेश बैरागी, उषा वाघ आदिनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी चुलत भाऊ विक्रम ताकाटे याने बहिणीला पिकअप गाडीतून (क्रमांक एम एच ४१ जी २९४२) नेऊन सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर मित्राच्या सहाय्याने सोग्रास शिवारात दोरीने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर सदर संशयितांनी युवतीचा मृतदेह अहेरगाव येथील पालखेड डाव्या कालव्यात पूर्ण पाणी असल्याने फेकून देत पलायन केले व तिने आत्महत्या केल्याचे दर्शविले. मात्र पिंपळगाव पोलिसांनी अवघ्या ४८तासात खुनाचा उलगडा करत संशयितांच्या मुसक्या आवळल्या असुन त्यांच्यावर खुनाचा व खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चुलत भावाने बहिणीचा बळी का घेतला याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.