नाशिक : तपोवनातील लक्ष्मीनारायण पुलाच्या अलीकडे रामटेकडीच्या पायथ्याशी मोकळ्या पटांगणात बेवारसपणे आढळून आलेल्या ‘त्या’ युवतीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना अखेर यश आले आहे. युवतीच्या खुनाचा उलगडा करत पोलिसांनी याप्रकरणी मयत युवतीच्या चुलत भावाला बेड्या ठोकल्या आहेत. अनैतिक संबंधातून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
तपोवनाजवळ गोदाकाठालगत निर्जनस्थळी गेल्या शनिवारी (दि.१२) भद्रकाली पोलिसांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजल्यामुळे पोलिसांना ओळख पटविणे कठीण झाले होते. महिलेच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले होते. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाला दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांनी तत्काळ सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, रघुनाथ शेगर यांचे पथक तयार करून अज्ञात मारेकऱ्याचा व मयत युवतीच्या नातेवाइकांचा शाेध सुरू केला. दरम्यान, पोलिसांनी माहिती घेत चाचपणी सुरू करत मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करत देवळालीगावापर्यंतचा माग काढला. ही युवती देवळालीगावातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या नातेवाइकांचे घर शोधून त्यांच्याद्वारे मृतदेहाची ओळख पटविली. जैनब शाम उर्फ जाकीर कुरेशी या युवतीचा मृतदेह असल्याची पोलिसांना खात्री पटली. देवळालीगावात तपासी पथकाने नातेवाइकांकडे सखोल चौकशी करत तिचा चुलत भाऊ संशयित दानिश जावेद कुरेशी (२०, रा. लोहारवाडा, देवळालीगाव) यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविला असता त्याने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी त्यास बेड्या ठोकून पुढील तपासाकरिता भद्रकाली पोलिसांच्या हवाली केले आहे.
--इन्फो--
दवाखान्याच्या ‘फाइल’ने दाखविला मार्ग
पोलिसांना घटनास्थळी शोधमोहिमेत एका दवाखान्याची तपासणी व उपचाराची फाइल आढळून आली. या फाइलनेच या मृतदेहाच्या नातेवाइकांसह मारेकऱ्याच्या शोधाची दिशा दाखविली. पोलिसांनी यावरून माहिती घेत चाचपणी सुरू करत मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करत देवळालीगावापर्यंतचा माग काढला. मृतदेह देवळालीगावातील युवतीचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या नातेवाइकांचे घर शोधून त्यांच्याद्वारे मृतदेहाची ओळख पटविली. जैनब शाम उर्फ जाकीर कुरेशी या युवतीचा मृतदेह असल्याची पोलिसांना खात्री पटली.
----इन्फो---
तीन महिन्यांची होती गर्भवती
मयत जैनब ही तीन महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. ‘तू माझा पती बनून माझ्यासोबत डॉक्टरकडे चल आणि गर्भपात करून आण’ असा तगादा मयत जैनब हिने लावला होता. यामुळे तिला तपोवन येथील एका जडीबुटी देणाऱ्या वैद्याकडे गर्भपात करण्यासाठी घेऊन जाण्याचा बनाव करत ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजता तिला तपोवन येथे दुचाकीने आणून तिचा गळा आवळला आणि डोक्यात दगड टाकून ठार मारले, अशी कबुली संशयित दानिश याने पोलिसांना दिली आहे. अनैतिक संबंधातून जैनबचा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.