नाशिक : शहरातील वाढत्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल येथे १८० ऑक्सिजन व ११५ सीसीसी अशा एकूण २९५ बेडची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या कोविड सेंटरचे उद्घाटन रविवारी (दि.१८) सकाळी ११.३० वाजता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांची प्रचंड संख्या लक्षात घेता शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाही. कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या कोविड सेंटरचा पर्यायी व्यवस्था म्हणून उपयोग होणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून १८० ऑक्सिजन बेडस असलेले नाविन्यपूर्ण कोविड केअर सेंटर नाशिकमध्ये प्रथमच उभे राहत आहे. या कोविड सेंटरमुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, कोविड केअर सेंटरसाठी डॉ.अभिनंदन जाधव यांच्यासह ५ एमबीबीएस व ४ बीएचएमएस असे ९ डॉक्टर तसेच १५ प्रशिक्षित परिचारिकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच एक ॲडमीन, तीन फार्मसी ऑफिसर, पाच रिसेप्शनिस्ट, १५ वाॅर्ड बॉय, १० सिक्युरिटी गार्ड भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे डॉ. शितल गुप्ता आणि डॉ.अतुल वडगांवकर यांचेही सहकार्य लाभणार आहे. रुग्णांना ने-आण करण्यासाठी किंवा संदर्भित करण्यासाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
इन्फो-
विरंगुळ्याच्या सुविधाही उपलब्ध
विभागीय क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटर मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि नाशिक महानगरपालिका यांच्या सहकार्यातून उभारण्यात आले आहे. या ठिकाणी रुग्णांना औषध उपचारासह दोन वेळचे जेवण, नाश्ता आदी सोयी मोफत मिळणार आहेत. रुग्णांच्या विरंगुळ्यासाठी वाचनालय व बुद्धिबळ, कॅरम आदी खेळ, कलाप्रेमींसाठी चित्रकलेची व्यवस्था यांसह करमणुकीसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्याची माहिती संयोजक माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली.
===Photopath===
170421\17nsk_37_17042021_13.jpg
===Caption===
विभागीय क्रीडा संकुलात उभारण्यात आलेले कोविड सेंटर